• Tue. Mar 10th, 2026
    Satara Shiv jayanti : साताऱ्यात शिवजयंती कार्यक्रमावरून वाद; अघोरी नृत्याच्या आयोजनावर अंनिसची हरकत

    सातारा नगरपालिकेने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या ‘अघोरी नृत्या’ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम शिवरायांच्या विज्ञानवादी विचारांच्या विरोधी असल्याचे सांगत तो रद्द करण्याची मागणी अंनिसने पत्रकाद्वारे केली आहे.

    सातारा नगरपालिकेचा अघोरी नृत्याचा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची अंनिसची मागणी.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    `सुधीर पाटील, सातारा : शिवजयंती निमित्त गुरूवारी सातारा नगरपालिकेच्या वतीने अघोरी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराजांनी असंख्य लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या होत्या. त्यांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये, म्हणून पालिकेने हा कार्यक्रम तातडीने रद्द करावा. यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पालिकेला तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी अंनिसने केली आहे.

    शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा नगरपालिकेने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजधानी सातारा शिवमय झाली आहे. मात्र, अघोरी नृत्याच्या कार्यक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंनिसने तातडीने एक पत्रक काढून पालिकेने तो कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. अंनिसने पत्रकात म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या होत्या. मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले. अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना, अवैज्ञानिक कार्यक्रम घेऊन छत्रपतींच्या विज्ञानवादी वारशाला सातारा नगरपालिकेने गालबोट लावू नये.”

    सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रोपट्याची पाळेमुळे महाराष्ट्रासह देशभरात रूजली आहेत. डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र सरकारने अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा केलेला आहे.

    Maharashtra TimesNagpur Crime: नऊ महिने पोटात वाढवलं, अन् आठव्या महिन्यात कचऱ्यात फेकलं; चिमुकलीचा निर्दयी अंत; नागपुरातला अमानुष प्रकार

    तसेच डॉ. दाभोळकरांच्या नावाने सातारा पालिका एक पुरस्कार देखील देते. त्याच नगरपालिकेने अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे लांच्छनास्पद असल्याची टीका अंनिसने पत्रकात केली आहे.

    छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेला तो कार्यक्रम रद्द करण्यायाविषयी तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी अंनिसने पत्रकात केली आहे. तसेच सातारा जिल्ह्याला संत आणि समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे.

    तुकाराम महाराजांपासून ते फुले, शाहू, आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी गोष्टी आणि अंधश्रद्धांवर कोरडे ओढले असल्याची जाणीव अंनिसने दोन्ही राजेंना करून दिली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा