Latur Student ends life : चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं
काय घडलं नेमकं?
आई, मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे, असे म्हणत तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमित उत्तम सोनकांबळे (वय २७, रा. शेळगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.आई-पप्पा, तुम्हाला सोडून जाऊ वाटत नाही. परंतु गेल्या चार वर्षांपासून तुमच्यापासून वेगळे राहण्याचा वैताग आला आहे, असा मजकूर लिहीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अमितने स्वतःच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१६) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमित मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरमधील रस्त्यावरील संभाजीनगरमध्ये भाड्याच्या खोली घेऊन राहत होता. खाडगाव आई-वडिलांपासून सलग चार वर्षे अलिप्त राहिल्याने त्याला नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्याने आई-वडिलांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली.
शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिलं?
त्यात आई-पप्पा, तुम्हाला सोडून जावे वाटत नाही. परंतु, अलिप्त राहण्याचा वैताग आला आहे. माझी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांना द्या, त्यांना अभ्यासाला उपयोगी पडतील, अशी भावनिक चिठ्ठी लिहून अमित सोनकांबळे याने त्याचे जीवन संपविले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
