• Mon. Jun 8th, 2026

    Kolhapur Crime: प्रेमविवाह करुनही पत्नीला धोका देत राहिला, ती भांडते म्हणून गळाच आवळला, अर्धमेल्या अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेला, पुढे असं काही घडलं की…

    Kolhapur Crime: प्रेमविवाह करुनही पत्नीला धोका देत राहिला, ती भांडते म्हणून गळाच आवळला, अर्धमेल्या अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेला, पुढे असं काही घडलं की…

    कोल्हापुरात संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १० दिवसांच्या उपचारानंतर स्वाती हुबाळे यांचा मृत्यू झाला असून…

    बाहेरील संबंधाच्या संशयावरून संसाराचा रक्तरंजित अंत, पतीने पत्नीला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : घरगुती वादातून पत्नीचा अमानुष खून करून फरार झालेल्या संशयित गणेश शंकर हुबाळे (वय 43, रा. सोन्या मारूती चौक, शनिवार पेठ) ला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआर हॉस्पिटलजवळील बासुरी हॉटेलच्या मागील भागातून अटक केली. 7 फेब्रुवारी रोजी गणेशने पत्नी स्वाती गणेश हुबाळे (वय 40) याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारा दरम्यान मंगळवार (17 फेब्रुवारी) रोजी स्वातीचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार देत पोलीस स्टेशन समोर मोठा आक्रोश केला. या आक्रोशानंतर भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बसून तपास करत संशयित आरोपी गणेश शंकर हुबाळे या ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    प्रेमविवाहानंतर सतत भांडणे; बाहेरील संबंधाचा संशय

    स्वाती आणि गणेश यांचा 2012 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दाम्पत्याला दोन मुले आहेत. गणेश कोल्हापुरी फेट्याचा व्यापारी असून, कोल्हापुरातील शनिवार पेठेत दुकान चालवतो. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. स्वातीला गणेशचे बाहेर संबंध असल्याचा संशय आल्याने होणारे वाद तीव्र झाले होते. दि. 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घरगुती कारणांमुळे चिडलेल्या गणेशने स्वातीचा गळा आवळला. ती गंभीर जखमी झाली तरी त्याने माहेरच्या माणसांना ती बेपत्ता असल्याची खोटी माहिती दिली आणि तिला कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून तो फरार झाला होता.

    नातेवाईकांचा आक्रोश; पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

    स्वातीवर उपचार सुरू असताना तीचा मृत्यू झाल्यावर राजोपाध्ये नगरातील बी. डी. कामगार वसाहतीत राहणाऱ्या स्वातीच्या माहेरच्या नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले. संशयिताच्या अटकेशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

    Maharashtra TimesManoj Jarange Patil: ‘फडणवीसांना कल्पना नसेल पण हे भयानक प्रकरण…’; नागपूरची महिला माझ्याकडे ढसाढसा रडली, धनंजय मुंडेंवर जरांगे पाटलांचे खळबळजनक आरोप

    स्वातीच्या आई जयश्री भाट यांनी फिर्याद दिली. स्थानिक गुन्हेगार अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी समजूत काढली. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रात्री उशिरा याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

    पोलिसांची वेगवान कारवाई; आरोपीची कबुली

    पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सागर वाघ, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने यांचे पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे सीपीआर हॉस्पिटलजवळ दाढी वाढलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या गणेशला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने घरगुती वाद, गळा आवळणे, पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू आणि अटकेच्या भीतीमुळे फरार असल्याचे सांगितले. पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

    दरम्यान या घटनेमुळे कोल्हापूर शहरात घरगुती हिंसेप्रती संवेदनशीलता वाढली असून, पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा