• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai Crime: मुंबईत प्रेमप्रकरणातून तरुणाचं धक्कादायक पाऊल; प्रेयसीवर आईचे गंभीर आरोप, ब्रेकअपनंतर तिने…

    Mumbai Love Affair: आवाज देऊनही तरुणाने प्रतिसाद न दिल्याने एका मित्राने खिडकीतून पाहिलं. तेव्हा तो तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर सदर तरुणाला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

    मुंबईत प्रेमप्रकरणातून तरुणाचं धक्कादायक पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: प्रेमप्रकरणातील अपयशातून येणाऱ्या नैराश्यामुळे होणाऱ्या आत्महत्यांची संख्या वाढत असल्याचं चित्र असताना मुंबईतील वडाळा परिसरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमभंगानंतर झालेल्या भावनिक त्रासामुळे आणि जातीय शिवीगाळ केल्यामुळे वडाळा येथे एका 17 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने जीवन संपवलं आहे. या प्रकरणी सदर तरुणाच्या अल्पवयीन मैत्रिणीवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची 35 वर्षीय आई ठाण्यातील एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करते. त्यांचा मुलगा दिवा येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. मात्र जानेवारी 2026 मध्ये तो शिर्डीला पायी चालत गेल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्या आणि तो मागील काही दिवसांपासून कॉलेजला जात नव्हता. अशातच 12 फेब्रुवारी रोजी आई कामावर गेल्यानंतर तो घरी एकटाच होता. सायंकाळी 5 वाजता आईचे त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं. मात्र नंतर तो फोन उचलत नसल्यामुळे आईला काळजी वाटली आणि तिने मुलाच्या मित्रांना त्याला बघायला पाठवले. मित्रांनी दार वाजवले, पण प्रतिसाद मिळाला नाही.

    एका मित्राने खिडकीतून पाहिले असता, त्याला तो तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मित्रांनी त्याला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

    आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाचे शिवडी इथं राहणाऱ्या एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या भांडणानंतर तो दोघे वेगळे झाले. त्यानंतर मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती मुलगी त्याला टाळू लागली होती आणि त्याने खालच्या जातीचा असल्यामुळे तिला त्याच्यासोबत राहायचे नाही, असं सांगितलं होतं. तसंच, मुलीच्या कुटुंबीयांनी माझ्या मुलाला शिवडी इथं येण्यास मनाई केली होती. त्या मुलीने सोशल मीडियावर इतर मुलांसोबतचे फोटो पोस्ट केल्याने मुलाला आणखी त्रास झाला. ब्रेकअप, जातीयवादी टोमणे आणि सोशल मीडियावरील गोष्टींमुळे आलेल्या तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचललं,” असा आरोप मृत मुलाच्या आईने केला आहे.

    दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा