नागपूरच्या काचीपुरा परिसरात भरधाव बुलेट आणि स्टंटबाजीमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण कबड्डीपटूंचा मृत्यू झाला आहे. वर्धा मार्गावरील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या बेफाम वेगावर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बुलेट पिलरवर आदळली
अनियंत्रित झालेली बुलेट रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या पिलरवर आदळली. अपघातात १९ वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर, दोघेही रा. काचीपुरा, गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
क्रीडावर्तुळात हळहळ
दोघेही परिसरातील कबड्डीपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे क्रीडावर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेने शहरातील वाढत्या वेगमर्यादा भंग आणि सिग्नल जंपच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. मध्यरात्रीनंतर वाहतूक कमी असल्याने काही तरुणांकडून चौकात स्टंटबाजी आणि रेसिंगचे प्रकार वाढत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार केली जात आहे.
Ajit Pawar: अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत मोठी अपडेट; नुकसान झाल्याचं मंत्रालयाकडून मान्य, तपासाबाबत महत्त्वाची माहिती
पंचनामा केला
अपघाताची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वेग आणि निष्काळजीपणाचा अचूक अंदाज घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन
या घटनेनंतर नागरिकांनी वर्धा मार्गावर रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. ‘वेगाचा थरार’ काही क्षणांचा असला तरी त्याची किंमत आयुष्यभराची ठरू शकते, याची जाणीव या अपघाताने पुन्हा करून दिली आहे. नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीरपणा यामुळे केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतरांचाही जीव धोक्यात येतो, हे या दुर्दैवी घटनेतून दिसत आहे.
