• Fri. Mar 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar News: तब्बल 16 हजार बनावट जन्मनोंद दाखल्यांनी खळबळ, छ. संभाजीनगरमधील गंभीर प्रकारानंतर किरीट सोमय्या आक्रमक

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १६ हजार संशयास्पद जन्म दाखल्यांचा खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. हा केवळ गोंधळ नसून देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याचे सांगत किरीट सोमय्यांनी प्रशासनावर तोफ डागली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील अवैध जन्म प्रमाणपत्र वाटपाच्या प्रकरणावरून प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून देशाच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे त्यांनी स्वागत केले असून बोगस प्रमाणपत्रे मिळवून देशात राहणाऱ्या घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

    महानगरपालिकेत १६ हजार संशयास्पद नावांची नोंद

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जुन्या रेकॉर्डमध्ये तब्बल १६ हजार नवीन नावे वाढवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेत यापूर्वीच ७०० संशयास्पद जन्म प्रमाणपत्रे दिली गेल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात महिनाभरात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात २०० लोकांची नावे आरोपी म्हणून समोर आली असून, महापौरांनी या संपूर्ण रेकॉर्डच्या सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारची बोगस नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे झाली आहे, त्या सर्वांची तपासणी आता कडकपणे केली जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

    जिल्ह्यातील गावांमधील लोकसंख्या आणि नोंदणीचा मोठा घोटाळा…

    संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. एका गावाची अधिकृत लोकसंख्या १३०० असताना मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या काळात तब्बल ३४४७ नवीन जन्मांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नोंदींमधील एकही नाव स्थानिक रहिवाशाचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असाच प्रकार यवतमाळमध्येही उघडकीस आला होता, जिथे १४०० लोकसंख्या असलेल्या गावात २७ हजार नोंदणी आढळल्या होत्या. सिल्लोडमध्ये देखील अकराशे अपात्र आणि बेकायदेशीर प्रमाणपत्रे दिली गेली असून, या प्रकरणाला गती देण्यासाठी महापौरांनी आता दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचे ठरवले आहे.

    Maharashtra TimesCrime News: ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या…’; भररस्त्यात विवाहित महिलेला शरीर संबंधांची मागणी; संतापजनक घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल

    देशाची सुरक्षा आणि घुसखोरांविरुद्ध कठोर भूमिका….

    जन्म प्रमाणपत्र हा देशाच्या सुरक्षेचा पाया असून, ज्यांचा जन्म येथे झाला नाही अशांना खोटे दाखले देऊन नागरिकत्व मिळवून देणे हे धोक्याचे आहे. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, मग तो बांगलादेशी असो किंवा रोहिंग्या, अशांना शोधून काढून परत पाठवले जाईल असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. महापालिका स्तरावर या प्रकरणाच्या देखरेखीसाठी भाजपच्या तीन वरिष्ठ नगरसेवकांची विशेष टीम बनवली जाणार असून ती संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.

    टिपू सुलतान आणि राष्ट्रीयत्वावरून विरोधकांवर टीका…

    निवडणूक जिंकली म्हणून कोणालाही भारताची घटना किंवा राष्ट्रीयत्वाची टिंगल करण्याचा अधिकार मिळत नाही, अशा शब्दांत सोमय्या यांनी विरोधकांचा समाचार घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसारच सर्वांना वागावे लागेल. छत्रपती शिवरायांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. काही महानगरपालिकांमध्ये आपल्या मनाला वाटेल तशी बोगस प्रमाणपत्रे वाटण्याचे काम सुरू आहे, मात्र टिपू सुलतानची प्रतिमा आणि विचार या मातीत मान्य होऊ शकत नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा