Baramati News: कॉलेजमधील विद्यार्थिनींना अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि या सगळ्याला विरोध केला तर वर्गात अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार शिक्षकाने केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नितीन शंकर तावरे या प्राध्यापकाने प्रथम वर्षातील अल्पवयीन विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवले. संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत मूल्यमापनातील ३० गुण न देण्याची धमकी देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आलं होतं. तसेच वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणे, जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि विरोध केल्यास वर्गात अपमानास्पद वर्तन करणे असे प्रकार या नराधम शिक्षकाने २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाब, टेडी, चॉकलेट देणे आणि सूचक वक्तव्य करणे, असे प्रकारही नितीन तावरे या शिक्षाने केल्याचं आता समोर आलं आहेत.
पालकांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
बारामतीतील महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार मांडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेला तात्काळ तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी पोक्सोसह इतर कलमान्वये आरोपी शिक्षकावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक देविदास साळवे हे करत आहेत.
