Nagpur FDA Raid: अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमन २०११च्या तरतुदीनुसार ब्राउन ब्रेडमध्ये (होल व्हिट फ्लोर) किती आटा असावा, याची नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले.
आटा ब्रेडमध्ये मैद्याचे प्रमाण केवळ ५० टक्के हवे, असे असताना अजित बेकरीच्या ब्राउन ब्रेडमध्ये ९० टक्के मैदा आढळला. उत्पादनाच्या लेबलवरही तसा उल्लेख आढळून आला. धरमपेठ येथील ब्लिंकिटच्या गोदामात ब्राउन ब्रेडचे ६४ पॅकेट्स आढळून आले. यापैकी ६० जप्त करण्यात आले असून चार पॅकेट्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे एफडीएकडून सांगण्यात आले.
धावण्याची शर्यत जिवावर बेतली! चिमुकला खेळायला गेला अन् नंतर थेट नाल्यात सापडली बॉडी, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
अजित बेकरीच्या लेआउटमध्ये एफडीएच्या पथकाने तपासणी केली असताना तेथील ब्रेडमध्ये मात्र आट्याचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले. केवळ ब्लिंकिट आणि बिग बास्केटसाठी हे उत्पादन तयार करत असल्याचे त्यांनी एफडीएला सांगितले, अशी माहिती एफडीएच्या दक्षता विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी ललित सोयाम यांनी दिली. अजित बेकरीकडे केंद्राचा परवाना असल्याने स्थानिक पथकाला त्यांच्यावर कारवाईचे अधिकार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची माहिती मुंबई कार्यालयाला देण्यात आली आहे, असे एफडीएकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘मटा’ने अजित बेकरीचे व्यवस्थापक दमनकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ‘ब्राउन ब्रेडमध्ये मैदा असतोच. तसा उल्लेखही आम्ही त्यावर केलेला आहे. १०० टक्के आटा ब्रेड वेगळे आहेत.’एफडीएकडून अशीच कारवाई बिग बास्केटमध्ये करण्यात आली. तिथे अजित बेकरीच्या ब्राउन ब्रेडचे ६ पॅकेट्स आढळून आले असून ते जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याचे सोयाम यांनी सांगितले. एफडीएच्या दक्षता विभागाचे साहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे व सहआयुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनात अन्नसुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, अमर सोनटक्के, वर्षा खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उद्धव ठाकरे किती दिवस लाचारी करणार? सपकाळांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा सवाल
ब्लिंकिटचे गोदामच अवैध
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी धरमपेठ येथील मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रा. लिंच्या गोदामाची तपासणी केली. या तपासणीत ब्लिंकिटकडे अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये अन्नपदार्थ साठा व विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला राज्य परवानाच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे परवाना नसताना या गोदामातून मालाची विक्री होत असल्याचे एफडीएला आढळून आले. त्यामुळे एफडीएचा परवाना मिळेपर्यंत कोणताही अन्न व्यवसाय करू नये, अशी नोटीस एफडीएकडून ब्लिंकिटला देण्यात आली आहे, असे एफडीएकडून सांगण्यात आले. सरोजनगर येथील बिग बास्केटकडे एफडीएचा परवाना असल्याने तेथील साठा जप्त करण्यात आला.
