• Sat. Aug 1st, 2026

    Kasara-Manmad Railway: रस्ते, रेल्वेंसाठी 11 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर, कसारा-मनमाड मार्गिकेचा विस्तार, पाण्याखाली दुहेरी बोगदे; कसे-कुठे?

    Kasara-Manmad Railway: रस्ते, रेल्वेंसाठी 11 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर, कसारा-मनमाड मार्गिकेचा विस्तार, पाण्याखाली दुहेरी बोगदे; कसे-कुठे?

    Kasara-Manmad 3rd and 4th Line: केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाकांक्षी रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. कसारा-मनमाड तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेमुळे रेल्वे वाहतूक सुधारेल. तसेच, अनेक रस्ते प्रकल्पांमुळे दळणवळण अधिक वेगवान होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    वृत्तसंस्था, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील महत्त्वाकांक्षी रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना शनिवारी मंजुरी दिली. महाराष्ट्रातील कसारा-मनमाड दरम्यान तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गिकेला हिरवा कंदील मिळाला असून, यात २४ किलोमीटर लांबीच्या बोगद्यासह एकूण पाच बोगदे असतील. यासोबतच दिल्ली-अंबाला, बल्लारी-होस्पेट या नव्या रेल्वे मार्गिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, महाराष्ट्र, तेलंगण आणि गुजरातमधील ११ हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांनाही मान्यता मिळाली आहे.

    या सर्व प्रकल्पांमुळे देशाच्या रेल्वे जाळ्यात ३८९ किलोमीटरची वाढ होणार असून, सुमारे ९७ लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. ‘पीएम-गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार’ हे प्रकल्प नियोजित असून, ते रेल्वे वाहतूक मजबूत करतील, मालवाहतूक वेगवान करतील आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करतील. तसेच, परिसराच्या सर्वांगीण विकासामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असे सरकारने म्हटले आहे.

    Maharashtra TimesThane Coastal Road: ठाण्याच्या खाडीवर बनवणार कोस्टल रोड, आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण; थेट वाढवण बंदर, कर्नाटक पोहचवणार मार्ग, पाहा Video

    महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला गती

    कसारा-मनमाड दरम्यान तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. या प्रकल्पात एकूण पाच बोगदे बांधले जातील, ज्यापैकी एक बोगदा २४ किलोमीटर लांबीचा असेल. विशेष म्हणजे, देशातील सर्वाधिक लांबीचा २७ किलोमीटरचा बोगदा जालना येथे सध्या निर्माणाधीन आहे. या नव्या दुहेरी मार्गिकेत २३७ पूल बांधले जातील, ज्यात १६ मोठे आणि २१८ लहान पुलांचा समावेश आहे.

    तसेच, पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारले जातील. दोन गावांमध्ये लोकांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी २१ ठिकाणी रुळाखालून ये-जा करण्याची सोय केली जाईल. या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होईल आणि वर्षाला अतिरिक्त ४६.१ दशलक्ष टन मालवाहतूक करता येईल.

    रस्ते प्रकल्पांनाही मोठा दिलासा

    केंद्राने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग १६० ‘अ’ (NH 160 A) च्या घोटी-त्र्यंबक (मोखाडा)- जव्हार- मनोर- पालघर पट्ट्याच्या अद्ययावतीकरण आणि पुनर्सवसनाला ३,३२०.३८ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई-दिल्ली द्रुतगती आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. सिन्नर- त्र्यंबक (मोखाडा)- घोटी- मनोर- पालघर मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. अंबड-सातपूर भागात औद्योगिकीकरण वाढल्याने मालवाहतूक वाढली आहे, हे लक्षात घेऊन केंद्राने हे पाऊल उचलले आहे. याशिवाय, गुजरातमधील धामसिया- बिटाडा/मोवी आणि नासापूर-मलोथा मार्गासाठी ४,५८३.६४ कोटी रुपयांचा प्रकल्प, तर तेलंगणातील राष्ट्रीय महामार्ग १६७ (NH 167) च्या रुंदीकरणासाठी ३,१७५.०८ कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे.

    Maharashtra TimesPune Metro: पुणे मेट्रोसाठी नवे प्रवेशद्वार, एसटी स्टँडवरून थेट स्टेशनवर पोहचणार; स्वारगेट, शिवाजीनगर… कुठे सुविधा सुरु?

    देशातील पहिला पाण्याखालील दुहेरी बोगदा

    मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने आसाममध्ये गोहपूर ते नुमालीगड दरम्यान ३४ किलोमीटरचा देशातील पहिला रस्ते-रेल्वेसाठीचा पाण्याखालील दुहेरी बोगदा बांधण्यासही मंजुरी दिली आहे. ब्रह्मपुत्र नदीखालून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी १८,६६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘देशात पाण्याखालील पहिला बोगदा कोलकात्यामध्ये हुगळी नदीत तयार करण्यात आला. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत समुद्राखालील बोगद्याचे काम सुरू आहे. हुगळी नदीतील बोगदा हा मेट्रोसाठी असून, गोहपूर-नुमालीगड प्रकल्पात देशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला समांतर असलेला पहिला पाण्याखालील दुहेरी बोगदा असेल.’

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा