• Wed. Aug 5th, 2026

    NCP SP : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड, सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त, पडद्यामागे काय घडतंय?

    NCP SP : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड, सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त, पडद्यामागे काय घडतंय?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त केल्याची घोषणा केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आज (४ ऑगस्ट २०२६) पासून पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहेत”, अशी मोठी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

    “यापुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी”, असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलं आहे.

    सुनेत्रा पवारांवरील टीकेने राजकारण तापलं

    शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यांच्या नियुक्त बरखास्त करण्याची टायमिंगची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया म्हणत खोचक टीका केली आहे. या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

    काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलने करत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पुण्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर चालून गेले. पण यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

    सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन जी टीका करण्यात आली आणि त्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन देत दुर्गा असल्याचं सिद्ध करुन दाखवा, असं म्हटल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त संतापले आहेत. राष्ट्रवादीचे विविध नेते आणि कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेवर आता शरद पवारांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असं असताना शरद पवारांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्याच बरखास्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    काँग्रेसच्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय बोलणार?

    सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर उभे राहिलेले पक्षाशी संबंधित प्रश्न आणि इतर घडामोडी याचे संपूर्ण राज्य साक्षीदार आहे. अजित पवार यांच्या निधनाची दुर्दैवी घटना घडून आता सात महिने होत आहेत. यानंतर आता सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधनं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय.