• Tue. Jun 16th, 2026
    Pune News: पुण्यात PMPML च्या चालत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग, 50 कामगार थोडक्यात बचावले,  क्षणात बसचा सांगाडा…, आगीचं नेमकं कारण काय?

    पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत ५० प्रवाशांनी भरलेल्या PMPML इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली…

    चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML बसला भीषण आग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    चाकण: पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत आज सकाळी एका भीषण घटनेने खळबळ उडाली होती. महिंद्रा कंपनीसमोर प्रवाशांनी भरलेल्या PMPML च्या धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये साधारण 50 कामगार प्रवास करत होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, ही घटना सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि काही वेळातच लाखो रुपयांची ही बस जागेवर जळून खाक झाली.

    चिंतेची बाब आणि वाढत्या घटना

    दरम्यान, अशा घटनांची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात PMPML च्या बसेसना आग लागण्याच्या किमान १० ते १२ घटना समोर आल्या आहेत. कधी इंजिन गरम होणे, तर कधी बॅटरीमधील बिघाड, ही कारणे दिली जातात. पण प्रश्न उरतोच की, 50 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तांत्रिक चुकांना जबाबदार कोण? प्रशासनाचा देखभाल-दुरुस्तीचा अभाव की कंत्राटदारांचा निष्काळजीपणा?

    जीवन-मरणाचे गणित

    एकीकडे आपण ‘ग्रीन मोबिलिटी’च्या गप्पा मारतो, पण त्याच इलेक्ट्रिक बसेस जर ‘फिरता मृत्यू’ ठरणार असतील, तर प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवायचा? दररोज लाखो पुणेकर या बसने प्रवास करतात. तांत्रिक तपासणीचा अभाव हे या घटनांमागचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

    Maharashtra TimesAjit Pawar: अजितदादांची जागा भरून काढणार, १५ वर्षांची परंपरा कायम ठेवणार; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांसाठी खास निर्णय, पुण्यात…

    काय काळजी घेणे आवश्यक आहे?

    दरम्यान, प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे असते, बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असावीत आणि चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण दिलेले हवे असणे बंधनकारक असते. धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा बसमध्ये असणे अनिवार्य आहे, असं संबंधित घटना टाळण्यासाठी गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

    दरम्यान, प्रशासनाने या घटनांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा प्रवाशांचा प्रवास हा कधीही अंतिम प्रवास ठरु शकतो.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा