• Sat. Mar 7th, 2026

    Satara Crime: खळबळजनक! बनावट नियुक्ती पत्र, खोट्या मुलाखतीही घेतल्या; तरुणांची तब्बल 1.80 कोटींची फसवणूक; नगरसेविका, PWD विभागातील अधिकाऱ्यांचा कारनामा

    Satara Crime: खळबळजनक! बनावट नियुक्ती पत्र, खोट्या मुलाखतीही घेतल्या; तरुणांची तब्बल 1.80 कोटींची फसवणूक; नगरसेविका, PWD विभागातील अधिकाऱ्यांचा कारनामा

    साताऱ्यातील मेढा पोलीस ठाण्यात मुंबईतील नगरसेविका आणि रेल्वे-बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसह ११ जणांवर १ कोटी ८० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेन आणि PWD मध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुटल्याचं हे प्रकरण आहे.

    वंदे भारतमध्ये नोकरी देतो म्हणत 1.80 कोटी लाटले, गुन्हा दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : मुंबईतील चेंबूरच्या नगरसेविका, मंत्रालय, मुंबई बांधकाम विभाग, रेल्वे खात्यातील अधिकाऱ्यांसह तब्बल ११ जणांवर साताऱ्यातील मेढा पोलीस ठाण्यात १ कोटी ८० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. वंदे भारत ट्रेन आणि सार्वजनिक बांधकाम विभागात मुलांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिषाने ही फसवणूक करण्यात आली असल्याचे शैलेश काशिनाथ पवार (वय ४८, रा. महिगाव, ता. जावळी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    गुन्हा दाखल

    शरीफा टाटा खान (नगरसेविका, चेंबूर, मुंबई), समीर चुंडमुंग, जहीर अमानुल्ला खान, इमान अमानुल्ला खान, नीलेश बाळकृष्ण ठाकूर, आनंद सिंग ऊर्फ बाबू शेठ ऊर्फ अंकल (रा. मुंबई व रांची, झारखंड), रेणू रामूसिंग ऊर्फ रेणू नीलेश ठाकूर, आशिष अगरवाल (रेल्वे अधिकारी), सुधीर गायकवाड, किशोर माळी (दोघेही बांधकाम विभाग, मुंबई), शामल मुखर्जी (मंत्रालय, मुंबई), अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

    यूपीआय व्यवहाराद्वारे…

    व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून बँक ऑफ महाराष्ट्र, सायगाव (ता. जावळी) येथील खात्यामार्फत तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर व मुंबई येथे फिर्यादी शैलेश पवार यांनी संशयितांना रोख रक्कम व यूपीआय व्यवहाराद्वारे १ कोटी ८० लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे परत द्यावे लागू नये म्हणून रेल्वे व बांधकाम विभागात भरती निघाली असल्याचे संशयितांनी त्यांना खोटे सांगितले.

    Maharashtra TimesPune News: पुण्यात PMPML च्या चालत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग, 50 कामगार थोडक्यात बचावले, क्षणात बसचा सांगाडा…, आगीचं नेमकं कारण काय?

    सगळंच बनावट

    संशयितांनी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुलांना वेळोवेळी ई-मेल, व्हॉट्सअप, मेसेज व फोन करून नियुक्तीबाबत बनावट आदेश तयार केले. बांधकाम विभागाच्या कार्यालयात मुलाखती घेतल्या. अहिल्यानगर, सोलापूर व कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात मुलांच्या खोट्या वैद्यकीय तपासण्या केल्या. नेमणुकीचे खोटे पत्र तयार करून मला व मुलांना पाठविल्याचे शैलेश पवार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

    यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले, सध्या गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, संशयित आरोपी हे मुंबईत वास्तव्यास असल्याने तिकडे जाऊन तपास करावा लागणार आहे. फिर्यादीच्या अनुषंगाने मेढा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा