• Mon. Mar 9th, 2026

    दादांच्या निधनानंतर शिंदेंनी अशी विधानं करु नयेत! तटकरेंनी शब्द न शब्द वाचला; तीव्र आक्षेप घेतला

    दादांच्या निधनानंतर शिंदेंनी अशी विधानं करु नयेत! तटकरेंनी शब्द न शब्द वाचला; तीव्र आक्षेप घेतला

    Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे शपचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विषय अधांतरीच राहिला आहे. यासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक विशेष लेख लिहिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर दादांच्याच नेतृत्त्वात काम करणार होतो, असा उल्लेख त्यात आहे. यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीत तटकरे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती, असा आशयाचा लेख शशिकांत शिंदे यांनी लिहिला आहे. तो लेख मी वाचला. याबद्दलचा निर्णय आमच्या नेत्या सुनेत्रा पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या विधिमंडळातील नेत्या आहेत. त्याच उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे वरिष्ठांसह चर्चा करुन त्या याबद्दलचा निर्णय घेतील. ज्यावेळी एखादा पक्ष आघाडीत येत असतो, त्यावेळी त्या आघाडीचं नेतृत्त्व करत असलेल्या मुख्य पक्षालादेखील विश्वासात घ्यावं लागतं. आम्ही आता एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमधील प्रमुख पक्ष भाजप आहे, असं तटकरे म्हणाले.

    शशिकांत शिंदे यांचा लेख मी वाचला. त्यातील एका वाक्यावर मला आक्षेप असल्याचं तटकरेंनी सांगितलं. ‘अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटेनाटे षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला. त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते,’ असं शिंदे यांनी लेखात नमूद केलं आहे. अजितदादा चूक दुरुस्त करणार होते, या वाक्यावर मला आक्षेप आहे, असं तटकरेंनी सांगितलं.

    अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं लिखाण करणं गैर असल्याचं म्हणताना भाजप सोबत जाण्याची भूमिका दादांनी खूप आधीपासूनच घेतली होती, ही बाब तटकरेंनी ठासून सांगितली. २०१४, २०१६-१७, २०१९ मध्ये कालावधीत याबद्दलच चर्चा, बैठका झाल्या. मी प्रदेशाध्यक्ष असतानाही याबद्दल आम्ही बोललो होतो. २०१९ मध्येही दादांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका मांडली होती. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास राज्याला स्थिर सरकार देऊ शकतात. केंद्राकडूनही राज्य सरकारला मदत मिळू शकते, अशी भूमिका वरिष्ठ पातळीवर दादा सातत्यानं मांडत होते. याच भूमिकेतून त्यांनी २०२३ मध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची आठवण तटकरेंनी करुन दिली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा