• Tue. Aug 4th, 2026

    दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2026
    दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ४ : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 2026‘ येत्या 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी चार वाजता होणार आहे. याच महोत्सवात दिल्लीतील दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश रामदासी, अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते.

    यावेळी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राबाहेर, विशेषतः देशाच्या राजधानीत, मराठी चित्रपटांना समर्पित असा व्यापक आणि सर्वसमावेशक महोत्सव प्रथमच आयोजित होत असून, मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावेत, नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांना चित्रपट क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी तसेच मराठी संस्कृतीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    दिल्ली मराठी प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय संस्था आणि सांस्कृतिक संघटनांच्या सहभागामुळे हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावरील एक दर्जेदार सांस्कृतिक पर्व ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार असून, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, दिल्ली सरकारचे कला, संस्कृती व भाषा मंत्री कपिल मिश्रा, राज्यसभा सदस्य तथा माजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे- पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    महोत्सवादरम्यान भीम सभागृह आणि समरसता सभागृह येथे 12 गाजलेल्या मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. देऊळबंद 2, मामाच्या गोव्याला जाऊ या, फुलवंती, घबाडकुंड, भूतम् भयम्, सामना, स्थळ, उत्तर, सत्यशोधक, तुंबाडची मंजुळा, आशा आणि गांधी टॉक्स या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्व चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह प्रदर्शित करण्यात येणार असल्याने अमराठी प्रेक्षकांनाही मराठी सिनेमाचा दर्जा, आशय आणि वैविध्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय 16 निवडक टेलिफिल्म्सचे तीन स्वतंत्र सत्रांमध्ये प्रदर्शन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील विविध विषय, प्रयोगशीलता आणि नव्या प्रवाहांची झलक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

    चित्रपट प्रदर्शनाबरोबरच कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी विशेष संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवीण तरडे, संदीप पाठक, अभिजित चव्हाण, उषा नाडकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, जयंत सोमलकर, रामदास फुटाणे आणि किशोर बेलेकर यांच्यासह अनेक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ महोत्सवात सहभागी होणार असून, ते चित्रपट निर्मितीतील अनुभव, बदलते तंत्रज्ञान आणि मराठी चित्रपटसृष्टीचे भवितव्य याविषयी प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

    चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी या महोत्सवात विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नालंदा सभागृहात एफटीआयआयच्या तज्ज्ञांकडून तीन दिवसीय मास्टरक्लास आयोजित करण्यात आली असून, अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, छायांकन आणि चित्रपटनिर्मितीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रदेखील प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी चित्रपटसृष्टीचा शतकभराचा प्रवास, तिची समृद्ध परंपरा, उल्लेखनीय योगदान आणि उत्क्रांती यांचा वेध घेणारी विशेष प्रदर्शनीही या महोत्सवात भरविण्यात येणार आहे. मराठी सिनेमाच्या वैभवशाली वारशाची प्रभावी ओळख करून देणारी ही प्रदर्शनी रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

    दिल्लीत चित्रपट रसिकांसाठी रसास्वाद मंडळ

    यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी सांगितले की, नवी दिल्लीतील मराठी चित्रपट रसिकांना दर्जेदार आणि अभिजात मराठी चित्रपटांचा सातत्याने आस्वाद घेता यावा, यासाठी मुंबईच्या धर्तीवर महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या पुढाकाराने ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ’ सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने कार्यरत होणाऱ्या या मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन, चित्रपट विषयक चर्चा, संवाद सत्रे तसेच चित्रपट संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    पत्रकार परिषदेत हा महोत्सव सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, सुरळीत नियोजन आणि आसनव्यवस्थेसाठी क्यूआर कोडद्वारे पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील मराठी बांधव, विद्यार्थी, चित्रपटप्रेमी तसेच विविध भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

     

    00000000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed