रायगड जिल्हा परिषदेवर प्रथमच सासू सून निवडून आल्या आहेत. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात हा इतिहास घडला आहे. दोघांनीही प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ जिल्हा परिषद गटातून मानसी दळवी या चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहा हजारांहून अधिक मतांनी पराभव करत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केला. सातत्याने विकासकामे, स्थानिक प्रश्नांची जाण आणि जनतेशी थेट संवाद या जोरावर त्यांनी हा विजय मिळवला आहे. थळ गटात दळवी कुटुंबाचे वर्चस्व याआधीही राहिले असले तरी चौथ्यांदा मिळालेला हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
अलिबागच्या नगराध्यक्षांची बहीण
त्याचवेळी चेंढरे जिल्हा परिषद गटातून आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई अदिती दळवी (नाईक) यांनी साडेपाच हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. अदिती नाईक या अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या बहीण असून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या आहेत. त्यामुळे चेंढरे गटात नाईक कुटुंबाचीही राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सत्तेचे गणित
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण 59 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाचे 21 उमेदवार विजयी झाले. शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5, काँग्रेसचे 2 सदस्य निवडून आले आहेत. सत्तेसाठी 30 आकडा गाठणे आवश्यक आहे. जिल्ह्याचं राजकारण पाहता शिवसेना शिंदे गट जरी मोठा पक्ष ठरला तरी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येत सत्तास्थापन करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
