या विवाहाकडे केवळ कौटुंबिक दृष्टिकोनातून नव्हे, तर राजकारण, उद्योग आणि क्रीडा क्षेत्राच्या संगमाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. रेवती सुळे या उच्चशिक्षित असून त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक प्रश्न, सार्वजनिक धोरणे आणि विकासविषयक मुद्द्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तर दुसरीकडे, सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव आहेत.
अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे संचालक असून विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. सारंग हे केवळ उदयोन्मुख उद्योजकच नाहीत, तर प्रोफेशनल बॅडमिंटन खेळाडू म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून क्रीडा क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
दरम्यान, या विवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेला कोणत्याही पातळीवर अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच, अलीकडेच पवार कुटुंबावर आलेल्या दुःखद घटनेमुळे विवाहाची औपचारिक घोषणा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचेही बोलले जाते.
एकंदर पाहता, रेवती सुळे आणि सारंग लखानी विवाहाची चर्चा ही केवळ एका कौटुंबिक नात्यापुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय, औद्योगिक आणि सामाजिक विश्वात कुतूहल निर्माण करणारी ठरली आहे. अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.