• Sat. Mar 7th, 2026

    ‘हिंद दी चादर महोत्सव’ प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    ‘हिंद दी चादर महोत्सव’ प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद


    नाशिक, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवावेत. याकरीता सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

    विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त यापूर्वी नागपूर, नांदेड येथे विविध कार्यक्रम झाले आहेत. तेथे लाखो भाविक सहभागी झाले होते. आता नवी मुंबईतील खारघर येथे कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यास आपापल्या जिल्ह्यातील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी) संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरू तेग बहादुर यांचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतील, असे नियोजन करावे.

    ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, निवासी शाळा, शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढावी. सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होईल, असे नियोजन करावे. व्यापक स्तरावर जनजागृती करावी. या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे सादर करावी.

    https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाची संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. नऊ समाज या कार्यक्रमाच्यानिमित्ताने एकत्र येत असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed