• Sun. Mar 8th, 2026

    दिवसा केटरिंगचं काम, रात्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; मोठा अधिकारी होण्याचं अनिकेतचं स्वप्न अधुरंच राहिलं, होतकरू तरुणाचा करुण अंत, नेमकं काय घडलं?

    दिवसा केटरिंगचं काम, रात्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास;  मोठा अधिकारी होण्याचं अनिकेतचं स्वप्न अधुरंच राहिलं, होतकरू तरुणाचा करुण अंत, नेमकं काय घडलं?

    स्पर्धा परीक्षेत अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधूरे तरुणाच्या स्वप्नांचा चुरडा झाला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा: दिवसभर कष्टाने काम करायचं आणि रात्री शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बुलढाणाच्या एका विद्यार्थ्याचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. संभाजीनगर येथील हर्सुलमधील जुना जकात नाका येथे हा अपघात झाला. याप्रकरणी पोलीसात कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्सुलजवळील जुना जकात नाक्याजवळ भरधाव कारने उडवलेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

    अनिकेत दिलीप निंबाळकर वय वर्ष २३ राहणार लांजुळ तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असे या मृत विद्यार्थ्यांचे तर मनोज सदाशिव भिलन असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अनिकेतसह मनोज सदाशिव भिलन , अविनाश नीतावने, विशाल भंडारे व इतर तरुण आईसाहेब लॉन्स येथे लग्नात केटरिंगच्या कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा वाहनाची कोणतीही सोय नसल्याने सर्वजण पाई पहाडसिंगपुराकडे निघाले.

    हर्सुल जुना जकात नाक्याच्या पुढे येणाऱ्या सुसाट कार क्रमांक MH 20 FU 75 75 चा चालक मंगेश कोलते यांनी अनिकेत निंबाळकर व मनोज भिलन यांना जोराची धडक दिली. धडकेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास अनिकेतचा मृत्यू झाला. मनोज भिलन याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली आहे.

    अनिकेत सोबतच कुटुंबीयांचे स्वप्नभंगले

    अनिकेत निंबाळकर याची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. तो अभ्यासात हुशार असल्याने कुटुंबीयांनी त्याला शिक्षणासाठी संभाजीनगरात पाठविले होते. तो समाजकार्य एम एस डब्ल्यू विषयात पीएचडीचे शिक्षण घेत होता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. आई आणि भाऊ कंपनीत जाऊन तर वडील शेती करून त्याला शिक्षणासाठी मदत करीत होते. तसेच अनिकेतही मिळेल ते काम करून खर्चाला हातभार लावायचा. शिकून मोठा अधिकारी व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. मात्र या अपघाताने अनिकेतसह निंबाळकर कुटुंबियांचे स्वप्न भंगले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा