• Tue. Jun 9th, 2026

    Satara ZP Election Result : सातारा जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट, त्रिशंकू निकाल, कोण सत्ता स्थापन करणार?

    Satara ZP Election Result : सातारा जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट, त्रिशंकू निकाल, कोण सत्ता स्थापन करणार?

    सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. जिल्हा परिषदेचा निकाल हा त्रिशंकू परिस्थितीसारखा लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपला बहुमत मिळविण्यात अपयश आलं असून सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने देखील करिष्मा दाखवला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांची बेरीज भाजपपेक्षा जास्त होत असल्याने दोन्ही पक्ष एकत्र येऊन झेडपीची सत्ता काबीज करणार का?, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    राष्ट्रवादी-शिवसेनेची जोरदार मुसंडी

    सातारा जिल्हा हा पुर्वीपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९९ पासून राष्ट्रवादीचे जिल्ह्यावर वर्चस्व होते. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे ११ पैकी तब्बल नऊ आमदार निवडून आले. त्यामुळे भाजपच जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता घेणार, अशी चर्चा होती. परंतु, स्वबळ आजमावण्यासाठी सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपाला मोठा फटका बसला. अजितदादांच्या राष्ट्रवादीने आणि शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जागा मिळाल्या.

    नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवार पराभूत

    सातारा जिल्ह्यात माजी मंत्री दिवंगत मदनराव पिसाळ यांची नात दीप्ती पिसाळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भावजय भारती गोरे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव सुरेंद्र गुदगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

    दिग्गजांची झेडपीत पुन्हा एन्ट्री

    राज्याचे माजी मंत्री दिवंगत विलासराव उंडाळकरांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सलग दुसऱ्यांदा झेडपीत एन्ट्री केली आहे. ते कराड दक्षिणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आहेत. माण तालुक्यातील कुकुडवाड गटातून जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी देखील झेडपीचे मैदान मारले आहे. शिरवळमधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांनी माजी उपाध्यक्ष आणि निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितीन भरगुडे-पाटील यांचा पराभव करत भाजपला नीरा घाट दाखवला.

    साताऱ्यातील कारी गटातून भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे निकटवर्तीय राजू भोसले यांनी जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजारहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. खटाव गटात शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे विजयी झाल्या. माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांनी कोळकी गटातून बाजी मारली. वाईतील भुईंज गणात माजी आमदार मदन भोसले यांची कन्या सुरभी भोसले आणि कुडाळ गणात माजी आमदार राजेंद्र शिंदे यांचे सुपुत्र सौरभ शिंदे यांनी पंचायत समितीचे मैदान मारले.
    Maharashtra TimesRaigad ZP Election Winner List : रायगड जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल, विजयी उमेदवारांची A टू Z यादी

    पाटणमध्ये शिवसेना सुसाट, एकहाती वर्चस्व

    पाटण तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेने अभूतपूर्व यश मिळवले आहे. जिल्हा परिषदेचे ७ पैकी ६ आणि १४ पैकी १३ पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा या निवडणुकीत मोठा करिष्मा पाहायला मिळाला. त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या पाटणकर गटाला या निकालाने जबर हादरा बसला आहे. ढेबेवाडी गटात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा शिवसेनेच्या अवघ्या २२ वर्षांच्या तरूणीने पराभव केला.

    काँग्रेसने दाखवला लढवय्या बाणा

    कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये काँग्रेसने दोन गट आणि दोन गणात उमेदवार उभे केले होते. त्यातील एक जिल्हा परिषद उमेदवार आणि दोन पंचायत समितीचे उमेदवार विजयी झाले. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या झंझावातात देखील कॉंग्रेसने कडवी झुंज देत मिळवलेले यश कौतुकास्पद म्हणावे लागेल.
    Maharashtra TimesSangli ZP Result : सांगलीत भाजपच्या हातून सत्ता जवळपास निसटली, मविआला सर्वात मोठं यश, वाचा A टू Z निकाल

    सातारा जिल्हा परिषदेचा कुणाला किती जागांवर यश?

    • भाजप – 27
    • राष्ट्रवादी काँग्रेस – 20
    • शिवसेना – 15
    • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष – 0
    • काँग्रेस : 1
    • इतर: 2
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा