Solapur News: ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता.
सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदान यंत्रे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली नाहीत. ती राखीव होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा ही मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्रे तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील दोन कंट्रोल युनिट व दोन बॅलेट युनिटसंदर्भात हा प्रकार घडला.
सुरक्षा कक्षात सीलबंद
घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला व ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही मतदान यंत्रे शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
