• Wed. Jun 17th, 2026

    आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, नेदरलँडच्या महापौरांचा नागपुरात जन्मदात्री आईचा शोध, प्रशासन युद्ध पातळीवर कामाला

    आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, नेदरलँडच्या महापौरांचा नागपुरात जन्मदात्री आईचा शोध, प्रशासन युद्ध पातळीवर कामाला

    नेदरलँडचे महापौर आपल्या जन्मदात्री आईच्या शोधासाठी नागपुरात आले आहेत. त्यांच्या या भावनिक शोधाची दखल प्रशासनानेदेखील घेतली आहे. त्यामुळे प्रशासानकडूनही महापौरांच्या आईच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’, ही म्हण पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं चित्र नागपुरात पाहायला मिळत आहे. जगाच्या पाठीवर मोठं यश, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवूनही आईच्या मायेची ओढ किती खोल असते, याचं भावूक उदाहरण नेदरलँड्समधील हीमस्टेड शहराचे महापौर फाल्गुन बिनेन्डिज्क यांच्या आयुष्यातून समोर आलं आहे. आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात फाल्गुन तब्बल 40 वर्षांनंतर नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा हा प्रवास सर्वांनाच भावूक करणारा ठरत आहे.

    फाल्गुन बिनेन्डिज्क यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1985 रोजी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये झाला. त्यावेळी त्यांची आई अवघी 21 वर्षांची आणि अविवाहित होती. सामाजिक कलंक, बदनामी आणि दबावाच्या भीतीने या तरुण मातेने केवळ तीन दिवसांच्या बाळाला नागपूरच्या मातृसेवा संघाकडे सुपूर्द केलं. त्यानंतर या बालकाला एका दाम्पत्याने दत्तक घेतलं आणि नेदरलँड्सला नेलं.

    नेदरलँड्समध्ये फाल्गुन यांचं शिक्षण, करिअर आणि राजकीय वाटचाल घडत गेली. पुढे ते हीमस्टेड शहराचे महापौर झाले. मात्र, एवढं यश मिळवूनही त्यांच्या मनात जन्मदात्या आईची पोकळी कायम राहिली. हीच ओढ त्यांना पुन्हा पुन्हा भारतात, विशेषतः नागपूरमध्ये घेऊन येत आहे. याआधी 2017 आणि 2024 मध्येही फाल्गुन आईच्या शोधात भारतात आले होते. ही त्यांची तिसरी भारत भेट आहे.

    नागपूरमध्ये आल्यानंतर फाल्गुन यांनी सर्वप्रथम मातृसेवा संघाच्या माजी अधीक्षक मंगला भुसारी यांची भेट घेतली. तब्बल 40 वर्षांपूर्वी याच मंगला भुसारी यांनी या अनाथ बाळाचं नाव “फाल्गुन” ठेवलं होतं आणि त्याला मायेची ऊब दिली होती. “तोच मुलगा आज परदेशात महापौर म्हणून माझ्यासमोर उभा आहे, हा क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. आता त्याला त्याची आई सापडावी, हीच माझी मनापासून इच्छा आहे,” असं मंगला भुसारी भावूक होत सांगतात.

    फाल्गुनच्या या भावनिक शोधाला आता प्रशासकीय पाठबळ मिळालं आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बालकल्याण विभाग, महापालिका आणि आरोग्य विभाग सक्रिय झाले आहेत. 40 ते 41 वर्षांपूर्वीच्या रुग्णालयातील जन्मनोंदी, दत्तक प्रक्रियेच्या फाईल्स आणि मातृसेवा संघाच्या रजिस्टरची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. मातृसेवा संघाच्या नोंदींमध्ये फाल्गुनची अचूक जन्मतारीख आणि आईचं नाव नमूद आहे. मात्र, त्या काळात सामाजिक भीतीपोटी आईने पत्ता अपूर्ण दिल्याने शोध कठीण ठरत आहे. तरीही प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, एका परदेशी महापौराचा हा भावनिक प्रवास केवळ वैयक्तिक नाही, तर मातृत्वाच्या नात्याची अमूल्य ताकद ठरत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा