‘उद्योजकांना धमकावणे आणि खंडणीचे प्रकार खपवून घेणार नाही’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पारनेरसारख्या भागात नवे औद्योगिक इकोसिस्टिम उभे राहत असताना जसे चांगले लोक येतात, तसे काही वाईट लोकही तयार होतात. उद्योजकांना धमकावणे, अडथळे निर्माण करणे, खंडणीसारखे प्रकार करण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी अशा लोकांचा बंदोबस्त केला असून, आता पुन्हा कोणी हिम्मत केली तर त्याला स्पेअर केले जाणार नाही. इज ऑफ डूइंग बिझनेस कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस आणि कायदा-सुव्यवस्था या तीन गोष्टी उद्योगाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
‘पुढील पाच वर्षे औद्योगिक वीज दरात वाढ नाही’
मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील पाच वर्षे औद्योगिक विजेचे दर वाढणार नाहीत; उलट ते कसे कमी होतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यावरही भर दिला जात आहे.
पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे स्पष्ट निर्देश
कायद्याच्या अंमलबजावणीबाबत ठाम भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की औद्योगिक क्षेत्रातील अगदी छोटी घटना सुद्धा गंभीरपणे घेतली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणीही उद्योजकांना त्रास दिला तर कायद्याने ठोकून काढायचे. ठोकून काढू याचा अर्थ हिंसा नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत अत्यंत कठोर कारवाई असा आहे.
‘झुंडशाही आणि दादागिरीवर सरकारचा अंकुश’
नागरिकांना उद्योगांकडून त्रास होत असल्यास त्यांनी अधिकृत नियामक यंत्रणेकडे दाद मागावी, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनैतिक प्रथा असतील तर रेग्युलेटर कारवाई करेल; पण झुंडशाही, दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्रातील कोणत्याही एमआयडीसीत खपवून घेतली जाणार नाही. जोपर्यंत भरतसारखे प्रामाणिक उद्योजक आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.