• Wed. Mar 11th, 2026

    Ahilyanagar News: ‘राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम’, महायुतीच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

    Ahilyanagar News: ‘राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम’, महायुतीच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

    यावेळी सामंत यांनी शिवसेनेच्या ताकदीचे आकडे मांडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: राष्ट्रवादी बाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले असून, या साऱ्या घडामोडींवर उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, हा पूर्णपणे त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय असला तरी या निर्णयासाठी शरद पवार साहेब पूर्णपणे सक्षम आहेत, असे ठाम मत सामंत यांनी व्यक्त केले.

    नेमकं काय म्हणाले सामंत?

    सामंत म्हणाले की, जयंत पाटील यांनी जे काही वक्तव्य केलं आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत होतं. मात्र अंतिम निर्णय घेण्याची ताकद, अनुभव आणि अधिकार हे शरद पवार साहेबांकडेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीबाबतचा निर्णय त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांवर पडदा पडेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

    ‘जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला राहील’

    दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही उदय सामंत यांनी आत्मविश्वास व्यक्त करत विरोधकांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘महायुतीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आहे, हे मान्य आहे. पण आम्ही भाजपाच्या अगदी पाठोपाठ आहोत. थेट दुसऱ्या क्रमांकावर आहोत, असंही यावेळी सामंत म्हणाले.

    Maharashtra TimesAmbadas Danve: ‘मंगळसूत्र’ उतरवणं हेच का तुमचं हिंदुत्व?’; परीक्षा केंद्रावरील नियमावलीवरून वाद, अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

    दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील शिवसेनेची कामगिरी सांगताना सामंत यांनी आकडेवारी मांडली. 60 आमदार निवडून येणं, 72 नगरपालिकांमध्ये अध्यक्षपद मिळवणं, 450 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणं ही आमची ताकद आहे.

    त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सत्तासमीकरणे बदलत असताना आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, उदय सामंत यांच्या या स्पष्ट, आक्रमक विधानांनी राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आणले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा