छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांना मंगळसूत्र काढून ठेवण्याच्या सूचनेवरून गदारोळ
नेमका गोंधळ प्रकार काय?
सकाळी ८ वाजेपासूनच शहरातील विविध केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी झाली होती. मात्र, आत जाताना मेटल डिटेक्टरचा बहाणा करत महिलांना मंगळसूत्र, कानातले आणि नाकातील दागिने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक विवाहित महिलांनी याला कडाडून विरोध केला. “इतर दागिने ठीक आहेत, पण मंगळसूत्र का?” असा सवाल विचारत महिला विद्यार्थी आक्रमक झाल्या. मात्र, केंद्राच्या ताठर भूमिकेमुळे अनेक महिलांना डोळ्यात पाणी आणून आपली मंगळसूत्रे नातेवाईकांच्या हवाली करावी लागली.
हिंदुत्ववादी सरकार मग हे काय?
या प्रकाराची माहिती मिळताच अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारचा खरपूस समाचार घेतला. दानवे म्हणाले की, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावे लागते, हे दुर्दैवी आहे. इतर दागिने समजू शकतो, पण मंगळसूत्र हे फक्त शोभेचं साधन नाही तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे. सरकारने ही जाचक नियमावली तात्काळ बदलली पाहिजे.”
सुरक्षेच्या नावाखाली सांस्कृतिक अवमान?
परीक्षा केंद्राबाहेरचे दृश्य अत्यंत वेदनादायी होते. ज्या महिलांसोबत कोणीही नातेवाईक नव्हते, त्यांना आपली महागडी मंगळसूत्रे बॅगेत किंवा असुरक्षित ठिकाणी ठेवावी लागली. “सरकारला पेपरफुटी रोखायची असेल तर यंत्रणा कडक करा, पण महिलांच्या भावनांशी खेळू नका,” असा सूर परीक्षार्थींमध्ये उमटत आहे.
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
“हे सरकार केवळ नावापुरतं हिंदुत्ववादी आहे का? सौभाग्याचं प्रतीक असलेलं मंगळसूत्र उतरवायला लावणं ही संस्कृती नाही. परीक्षा पारदर्शक व्हावी ही आमचीही इच्छा आहे, पण त्यासाठी हिंदू संस्कृतीतील प्रतीकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.”
