• Tue. Mar 10th, 2026
    मोठी बातमी: एकनाथ खडसेंना दणका! कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट; नेमकं कारण काय?

    खडसे दाम्पत्याला अटक होणार का? न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुण्यातील बहुचर्चित भोसरी जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने दिलेला हा दणका खडसे कुटुंबासाठी धक्का मानला जात आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    भोसरी येथील एमआयडीसीच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर आहे. या प्रकरणी ईडीने तपास करून खडसे दाम्पत्य आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यासह अन्य काही कंपन्यांविरुद्ध सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या सर्वांवर मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी न्यायालयाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता, त्यामुळे त्यांच्यावरील आरोप निश्चित होतील असं मानलं जात होतं.

    न्यायालयाने वॉरंट का काढले?

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ फेब्रुवारी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. यावेळी न्यायालयाकडून खडसे यांच्यावर आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र, सुनावणी दरम्यान एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे दोघेही न्यायालयात गैरहजर राहिले. या अनुपस्थितीची गंभीर दखल घेत विशेष न्यायालयाने त्यांच्या विरोधात थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

    Maharashtra TimesSolapur Crime : अर्धवट बांधलेल्या इमारतीचे 17 मजले चढले, प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाने अंतिम क्षणी पनाश अपार्टमेंट का निवडलं?

    पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला

    या खटल्याला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आधीच नकार दिला आहे. त्यामुळे सत्र न्यायालयातील कारवाई सुरूच आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही नुकताच फेटाळण्यात आला असून ते सध्या कोठडीत आहेत. आता १३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून, त्या दिवशी खडसे न्यायालयात हजर राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    राजकीय वर्तुळात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष १३ तारखेला या प्रकरणात पुढे काय होणार याकडेही लागलेलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा