आरसीएफ कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. टेरेसवर काम करत असताना अचानक तोल गेला आणि त्यांचा अपघात झाला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव रामसेवक रवींद्र वर्मा (वय 43 वर्षे) असे आहे. ते सध्या लोणारे, घरत आळी, अलिबाग येथे वास्तव्यास होते. मूळचे ते घर क्र. 01, कुंडीदिह, कुंडी दि़ह, पोस्ट ऑफिस – दुहबीहरा, जिल्हा – बलिया, उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते. ते आर.सी.एफ. कंपनीतील बॅगिंग प्लांटमध्ये काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रामसेवक वर्मा हे बॅगिंग प्लांट परिसरातील टेरेसवर काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. क्षणाचाही विलंब न होता ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. अपघात होताच सहकारी कामगारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वरिष्ठांना याची माहिती दिली.
जखमी अवस्थेत रामसेवक वर्मा यांना तात्काळ आर.सी.एफ. कंपनीतील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कंपनीच्या कुरुळ वसाहत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रामसेवक वर्मा यांना मृत घोषित केले.
या कामाचे कंत्राट लोणारे येथील संतोष म्हात्रे यांच्याकडे असल्याची माहिती असून, मयत रामसेवक वर्मा हे अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वीच कामावर रुजू झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. या घटनेबाबत चेतन चंद्रकांत घरत (वय ३२ वर्षे, ठेकेदार, आर.सी.एफ. कंपनी) यांनी संबंधित पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.या घटनेनंतर आर.सी.एफ. कंपनीतील कामगारांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून, औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
