मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात एक पुरुष बुरखा परिधान करुन शिरल्याचा धक्कादायक दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतल्या प्रकारावरुन महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई लोकलमधला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक पुरुष बुरखा परिधान करुन थेट महिलांच्या डब्ब्यात शिरल्याचा प्रकार बघायला मिळाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहेत. विशेष म्हणजे रेल्वे पोलीस तिथे येण्याआधीच तो पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे. या घटनेबाबत अधिकृत अशी माहिती समजू शकलेली नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओची ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ खरा असेल तर मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला या खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याआधीदेखील मुंबई लोकलमध्ये महिला डब्ब्यात एखाद्या पुरुषाने धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला होता.
खरंतर महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर हे महिला आणि मुलींसाठी अतिशय सुरक्षित असं शहर मानलं जातं. इथे महिला आणि मुली रात्रीच्या वेळी देखील सुरक्षितपणे मुक्तपणे संचार करु शकतात. पण तरीही मुंबईत काही अनपेक्षित घटना या घडतातच. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. याआधीदेखील मुंबईत अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे मुंबई लोकल ही मुंबई आणि उपनगराची लाईफलाईन मानली जाते. या लाईफलाईनमधून दररोज लाखो महिला प्रवासही करतात. या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनेची सध्या चर्चा होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई लोकलमध्ये एक पुरुष हा चक्क बुरखा परिधान करुन महिलांच्या डब्ब्यात शिरल्याचा दावा केला जात आहे. हा पुरुष बुरख्यात महिलांना चुकीचा स्पर्श करायचा, असा आरोप व्हायरल झालेल्या व्हिडीओत करण्यात आला आहे. संबंधित घटना ही घाटकोपर स्टेशन दरम्यान घडल्याची चर्चा आहे. बुरखाधारी पुरुष हा घाटकोपर स्टेशन येथून महिला डब्ब्यात चढल्याची शक्यता आहे. त्याच्या या विक्षिप्त आणि विकृत वागण्याची चाहूल महिला डब्ब्यातील प्रवाशांना लागली. त्यांनी तातडीने त्याला जाब विचारला. यावेळी तो हात पुढे करुन काहीतरी बोलू लागला.
या पुरुषापासून आपला बचाव व्हावा यासाठी महिला बाजूला होऊ लागल्या. परिणामी हा पुरुष रेल्वे डब्ब्याच्या बाहेर पडला आणि दुसऱ्या गाडीने पळून गेला, असा आरोप संबंधित व्हिडीओत केला जात आहे. या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केल्याचा दावाही व्हिडीओत करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्याचा शोध घेत असल्याची देखील माहिती संबंधित व्हायरल व्हिडीओत देण्यात आली आहे. या व्हिडीओबाबत प्रशासनाकडून काही खुलासा केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा