• Sat. Jun 6th, 2026

    Kolhapur Accident : पिता आणि मुलीची काहीच चूक नव्हती, तरीही आक्रीत घडलं, बाप-लेकीचा करुण अंत, कोल्हापूर हादरलं

    Kolhapur Accident : पिता आणि मुलीची काहीच चूक नव्हती, तरीही आक्रीत घडलं, बाप-लेकीचा करुण अंत, कोल्हापूर हादरलं

    कोल्हापुरात भरधाव कारने तीन दुचाकींना धडक दिली. या घटनेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ तलाव रस्त्यावर शनिवारी दुपारी घडलेल्या एका भयानक अपघाताने कोल्हापूर शहर हादरून गेले. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने (एमएच 09 जीझेड 5175) नियंत्रण गमावून तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने या अपघातात बाप-लेकीला आपला जीव गमावावा लागला आहे. तर इतर दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार रस्त्याच्या मधोमध उलटी पडली होती. पोलिसांनी 19 वर्षीय तरुण चालक मयुरेश योगेश पाटील (रा. राजारामपुरी, 8 वी गल्ली) याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबीयांना अश्रूंचा बांध सावरता आला नाही.

    भरधाव कारमुळे घडला अपघात

    प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरीकडून कोटीतीर्थाकडे जाणारी एक क्रेटा कार अत्यंत बेदरकारपणे वेगाने धावत होती. शाहू मिल चौकातील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने समोरच्या तीन दुचाकींना प्रचंड जोराने धडक दिली. यावेळी दीपक महादेव वंशे (वय 66) आणि त्यांची मुलगी ॲड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय 30) हे बाप-लेकी दुचाकीवर होते. कारच्या भयंकर धडकेने ते हवेत उडून दूरवर पडले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमी कैवल्य उदय नाईक आणि धनंजय करंजकर यांना रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात नेले गेले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. “जखमींना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर कारचालक मयुरेश पाटील याला ताब्यात घेतले आहे. या अपघाताबाबत अधिकचा तपास पोलिसांकडून सुरु आहे”, अशी माहिती शहर पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितले आहे.

    दुचाकींचा चक्काचूर, कार रस्त्यावर पलटी

    अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला होता. कार रस्त्याच्याकडेला पलटी झाली होती. तर कारने ठोकलेल्या तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. अचानक झालेल्या या भयानक अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. काहींनी मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सावरण्यासाठी पलटलेली कार आणि अपघातग्रस्त दुचाक्या बाजूला केल्या. शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ तलाव रस्ता गर्दी आणि गोंधळामुळे काही वेळ पूर्णपणे बंद झाला होता, वाहतुकीचा प्रचंड गोंधळ उडाला. या अंगाचा थरकाप उडवणारे ते दाहक दृश्य होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

    कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

    या अपघातात मृत्यू पावलेले दीपक वंशे (रा. सनगर गल्ली, दिलबर तालीम मंडळाजवळ) हे कोल्हापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. आरोग्य विभागात त्यांनी दीर्घकाळ सेवा केली होती. तर त्यांची मुलगी भाग्यश्री ही वकील होती. दीड वर्षांपूर्वी विवाहानंतर ती कसबा बावडा येथे जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सासरी राहत होती. या अपघाताने दोघांचे कुटुंब शोकाकुल झाले आहे.

    दरम्यान शाहू मिल चौक परिसर हा शहरातील प्रमुख चौकांपैकी आणि वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असल्याने इथे नेहमी गर्दी असते. तरी कोल्हापुरात चालकांच्या बेदरकारपणामुळे असे अपघात वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत कोल्हापुरात वाढलेल्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वेग नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा