• Tue. Jun 30th, 2026

    उबाठा-मनसे युतीला तडा

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    उबाठा-मनसे युतीला तडा
    नाशिक
     महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला निवडणुकीनंतर तडा गेला आहे. महापालिकेत भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेत येणार असल्याने इतर सत्तेची पदे मिळवण्यासाठी पक्षांकडून आघाडी-युतीचे गणित सुरू झाले आहे.त्याचाच भाग म्हणून मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदेसेनेसोबत आपली सदस्यनोंदणी केली आहे. यामुळे स्थायी समितीवर भाजपचा एक सदस्य कमी होणार असला तरी, मनसेचे नाशिकमधील स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्पष्ट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने २६ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला आहे. शिवसेना उबाठा १५, राष्ट्रवादी काँग्रेस चार, काँग्रेस तीन, तर मनसे व अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौरांसह स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडेच राहणार आहे. परंतु, स्थायी समिती सदस्यांसह विषय समित्यांसाठी विरोधकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

    अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या एकमेव नगरसेवकाने शिवसेनेसोबत गटनोंदणी केली आहे. त्यानंतर महापालिकांच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देऊ केले आहे. त्याशिवाय शिवसेनेनेदेखील स्थायी समितीमध्ये टक्का वाढवून आणखी एक सदस्य पाठविण्यासाठी मनसेला सोबत घेतले आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे शिवसेनेने मनसेच्या एका सदस्याची गटनोंदणी केली. त्यामुळे सभागृहात नगरसेवकांचा आकडा २७ झाला आहे. तर, दुसरीकडे उबाठा आणि मनसे युतीला तडा गेला असून, मनसेचे नाशिकमधील स्वतंत्र अस्तित्व आता संपुष्टात आले आहे.

    मनसेचे अस्तित्त्व संकटात
    विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत राहणे आवश्यक असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी सांगितले, तर मनसेचे स्थानिक नेते या विषयावर अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाशिकमध्ये निवडून आलेली एकमेव मनसेची सदस्यही आता शिंदे गटाला जाऊन मिळाली आहे. विशेष म्हणजे अंकुश पवार यांनीच विकासासाठी शिंदेसेनेसोबत आघाडी करीत, मनसे नेतृत्वाला झटका दिला आहे. तर, स्थानिक नेत्यांनी याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे स्पष्ट केल्याने मनसेतील अनागोंदी पुन्हा एकदा समोर आली आहे.

    शिवसेनेचा फायदा, भाजपचा तोटा
    मनसेमुळे शिंदेसेनेची स्थायी समितीतील ताकद वाढणार आहे. १२२ सदस्यांच्या सभागृहात स्थायी समितीच्या १६ सदस्य नियुक्तीसाठी ७.६२५ चा कोटा आवश्यक आहे. भाजपच्या सदस्यसंख्येनुसार दहा, २६ नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे तीन, पंधरा सदस्य संख्या असल्याने उबाठाला दोन, तर चार सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उतरत्या क्रमानुसार एक जागा मिळणार होती. काँग्रेस तसेच मनसेला स्थायी समितीवर जाता येत नव्हते. परंतु, आता मनसेने शिवसेनेसोबत गटनोंदणी केल्याने शिवसेनेचा कोटा वाढला आहे. त्यामुळे स्थायी समितीवर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त होऊ शकतात. त्यामुळे भाजपची सदस्य संख्या ही १० वरून नऊवर येणार असल्याने भाजपला फटका बसला आहे.मनसे सदस्याची शिंदेसेनेतीला गटनोंदणीबाबत पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून मला व शहराध्यक्षांना माहिती नाही. तसेच जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी चर्चादेखील केली नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे अहवाल पाठविला जाणार आहे. लीम शेख, उपाध्यक्ष, मनसे

    स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच शिंदेसेनेसोबत आघाडी केली आहे. प्रभागाच्या विकासासाठीच हा आघाडीचा निर्णय घेतला आहे. – अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे

    स्थायी समितीचा कोटा
    पक्ष- जागा- कोटा- सदस्य
    भाजप —७२ –९.४४ –९
    शिवसेना व मनसे —२७ –३.५४ –४
    शिवसेना (उबाठा) —१५ –१.९६ –२
    राष्ट्रवादी —४ –०.५२ –१
    काँग्रेस —३ –०.३९ –०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *