अपघाताच्या काही दिवस आधी अजित पवारांशी संवाद झाला होता. त्याचवेळी त्यांनी बारामतीला एकत्र जाऊ म्हटलं होतं. २८ जानेवारीच्या सकाळी आम्ही दोघे एकाच विमानानं जाणार होतो. पण मी मुंबईत उशिरा पोहोचलो. त्यामुळे अजित पवारांसोबत बारामतीला जाऊ शकलो नाही. अजित पवारांचा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूनं राज्याची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत जानकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला सकाळी पावणे नऊच्या सुमारास अपघात झाला. दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्यानं आणि विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला जात होते. बारामतीत असलेल्या धावपट्टीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर त्यांचं विमान कोसळलं. या अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या पार्थिवावर २९ जानेवारीला शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी हजारोंचा जनसागर लोटला होता.