पुणे
यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कर हस्तांतरणातून ९८ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. केंद्राच्या मदतीने राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी अतिरिक्त १२ हजार ३५५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एकूण एक लाख दहा हजार ६६१ कोटी रुपये मिळतील. इतकी मोठी रक्कम महाराष्ट्राला कधीही मिळाली नव्हती,’ असा दावा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केला.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक किंमत मिळणारी पिके, पिकांचे वैविध्य यांवर भर दिला आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी दहा हजार कोटींचा ‘एसएमई ग्रोथ फंड’ प्रस्तावित केला आहे. ‘नारी शक्ती’ला बळ देण्यासाठी बचत गटांना भरीव अर्थसाह्य केले जाणार आहे,’ असे जावडेकर म्हणाले.
प्रकाश जावडेकर म्हणाले…
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख, विकासाभिमुख, प्रगतिशील.
हा अर्थसंकल्प विकसित, आत्मनिर्भर भारताचा पाया.
भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठीचा हा संकल्प.
‘सेमीकंडक्टर मिशन २.०, बायोफार्मा शक्तीमधून क्रांती घडेल.
‘ऑरेंज इकॉनॉमी’ मधून सर्जनशीलता व डिजिटल कौशल्यांना गती.