• Tue. Jun 30th, 2026

    इलेक्ट्रिक गाडीचे चार्जिंग बंद करणे विसरले अन् घर, कारसह दुकानाची झाली राखरांगोळी

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    इलेक्ट्रिक गाडीचे चार्जिंग बंद करणे विसरले अन् घर, कारसह दुकानाची झाली राखरांगोळी
    सोलापूर
    सोलापूरमधल्या अकलूजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका छोट्याशा चुकीमुळे भीषण आग लागली आहे. याआगीमध्ये राहते घर, चारचाकी गाडी, आणि मशिनरीचे दुकान जळून पूर्णपणे खाक झाले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

    नेमंक काय घडलं?

    प्राप्त माहितीनुसार अकलूज शहरातील गजबजलेल्या महावीर पथ परिसराक ही घटना घडली आहे. सुहास गांधी यांचे राहते घर आणि मिशनरी यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कामकाज आटोपल्यानंतर गांधी यांनी त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी घऱाच्या परिसरात चार्जिंगला लावली. मात्र चार्जर न काढता त्यांनी दुचाकी तशीच चार्जर कनेक्टेड असलेली ठेवली. चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर ते स्विच बंद करायला विसरले. मध्यरात्रीच्या सुमारास बॅटरी ओव्हरहीट झाल्याने शॉर्ट सर्किट झाला आणि दुचाकीने अचानक पेट घेतला.

    आगीचे रौद्र रूप आणि थरार

    रात्रीची वेळ असल्याने सर्वजण गाढ झोपेत होते. दुचाकीला लागलेली आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच या आगीने शेजारी उभ्या असलेल्या चारचाकी कारला आपल्या विळख्यात घेतले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की, पाहता पाहता या आगीने जवळच असलेल्या मशिनरीच्या दुकानाला आणि घरालाही वेढले. धुराचे लोट आणि आगीचे तांडव पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आगीने सर्व काही भस्मसात केले होते.

    होत्याचे नव्हते झाले!

    या आगीत गांधी यांचे राहते घर आणि उत्पन्नाचे साधन असलेले मशिनरीचे दुकान पूर्णपणे जळून राख झाले आहे. दुकानातील महागडी यंत्रसामग्री, कार आणि दुचाकी अशा सर्वच गोष्टींचे कोळसा झाल्याने गांधी कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच एक मोठी दिलासादायक बाब ठरली.

    नागरिकांना खबरदारीचे आवाहन

    एका छोट्याशा विसरभोळेपणामुळे आयुष्यभराची कमाई डोळ्यादेखत खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात चार्जिंग करताना योग्य ती खबरदारी घेणे, दर्जेदार वायर वापरणे आणि चार्जिंग पूर्ण झाल्यावर स्विच बंद करणे किती अनिवार्य आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed