नाशिकमध्ये उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपकडे महापौर-उपमहापौर पदासाठी एक हाती सत्ता आहे. यातच आज भाजपकडून खबरदारी म्हणून सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी सहल काढण्यात आली आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपकडून काळजी काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाशिकमध्ये आज मनसे सोबत युती करत नवीन गट स्थापन केला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात निवडूक लढले आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे पक्षाच्या नगरसेवकांचे संख्याबळ जर पाहिलं तर शिंदे गटाकडे एकूण २६ नगरसेवक आहेत तर मनसेकडे १ नगरसेवक अशी संख्या आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती होण्याची चर्चा असतानाच शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेने नाशिकमध्ये युती करत शहर विकास आघाडी हा नवीन गट स्थापन केला आहे. त्यांच्या युतीमुळे नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.महापालिकेतील समित्यांबाबतचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. इतर पक्षांच्या नगरसेवक संख्येचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ नगरसेवक, उबाठा १५, काँग्रेस ३, अपक्ष १ अशी पक्षनिहाय नगरसेवकांची संख्या आहे.
शिवसेना ठाकरे गटासोबत महापालिका निवडणुकीत लढलेल्या मनसेने महापौर निवडणुकीच्या काही तासांआधीच शिवसेना शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्याने महापालिकेतील भाजपचे विविध समिती आणि स्थायी समितीच गणित कुठे तरी बिघडणार असल्याची चर्चा आहे.
या घडामोडींवर शिंदे गटाचे उपनेता तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार यांच्या काही दिवस संपर्कात होतो,त्यांना विनंती केली होती आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आपण एकत्र यावे त्या गोष्टीला दाद देत मनसे एकत्र आली असून आपण त्यांचे स्वागत करतो.या संपूर्ण यांच्यात सिंहाचा वाटा असेल तो म्हणजे शिवसेनेचे सचिव नरेश म्हस्के यांचा असून, त्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे ही यश लाभले आहे”, अशी प्रतिक्रिया अजय बोरस्ते यांनी दिली.