• Tue. Jun 30th, 2026

    भाजप शहराध्यक्ष केदार यांचे चोवीस तासांत घूमजाव

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    भाजप शहराध्यक्ष केदार यांचे चोवीस तासांत घूमजाव
     नाशिक
    नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आपल्या पसंतीच्या नगरसेवकांना संधी न दिल्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनाम्याचा स्टंट त्यांच्याच अंगलट आला.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहापौरांच्या नावांची घोषणा केली असताना, केदार यांनी थेट मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांनाच आव्हान दिले. त्यामुळे प्रदेश पातळीवरूनच केदार यांची कानउघडणी झाल्यानंतर चोवीस तासांत ‘यू टर्न’ घेत आपले समाधान झाल्याचा हास्यास्पद दावा केदार यांनी केला आहे. त्यामुळे तिकीट वाटपापासून सुरू झालेला राडा भाजपमध्ये महापौरपदाच्या खुर्चीपर्यंत कायम राहिल्याने पक्षातला बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.महापालिकेची निवडणूक भाजपसाठी यंदा वादळी ठरली आहे. निवडणुकीपूर्वी आयारामांना दिलेले आवतन, तिकीट वाटपावेळी झालेल्या राड्याने भाजपची राज्यभर बेअब्रू झाली होती. त्यानंतर महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीतही भाजपमध्ये नाराजीनाट्य दिसून आले आहे. महापौरपदासाठी भाजपमधून डझनभर नगरसेविका इच्छुक होत्या. मात्र, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि उच्चशिक्षित अशा हिमगौरी आहेर-आडकेंची महापौरपदासाठी, तर पंचवटीतील मच्छिंद्र सानप यांची उपमहापौरपदासाठी भाजपकडून निवड करण्यात आली.

    आपण जी नावे सुचवली, त्याऐवजी दुसऱ्यालाच पक्षाने संधी दिल्याचे सांगत टेक्स्ट मेसेजवर आपला राजीनामा दिला होता. मात्र, या प्रकारामुळे भाजपची समाजमाध्यमांत बदनामी झाली. नाशिकमध्ये बहुमत असतानाही उमेदवार निवडीवरून नाट्य रंगल्यानंतर पक्षाने याची गंभीर दखल घेतली. याबाबत वरिष्ठ पातळीवरून केदार यांची कानउघडणी झाल्यानंतर केदार यांनी चोवीस तासांत यू टर्न घेतला. माझे समाधान झाल्याने राजीनामा मागे घेत असल्याचे सुनीर केदार यांनी सांगितले.कोअर कमिटीच्या बैठकीनंतर हलली सूत्रे
    केदार यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद बंद केला होता. त्यामुळे वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेत कोअर कमिटीला तातडीने संदेश पाठवत नव्या शहराध्यक्षांची नावे सुचवण्याचे निर्देश दिल्याचे समजते. कोअर कमिटीने काही इच्छुकांशीही बुधवारी (दि. ४)) बंद दाराआड चर्चा केली. याबाबतची माहिती केदार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुनील केदार यांनी तातडीने राजीनामा मागे घेतल्याची चर्चा आहे.

    मुख्यमंत्री, कुंभमेळामंत्र्यांनाच आव्हान !
    केदार यांनी वारंवार पक्षाला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली आहे. तिकीटवाटप करताना झालेल्या आर्थिक आरोपांकडेही त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही वरिष्ठांना विश्वासात न घेताच केदार यांनी परस्पर शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन सत्तावाटपाबाबत चर्चा केली होती. त्यामुळे कुंभमेळामंत्री महाजन यांनाच ‘आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याचे’ स्पष्ट करावे लागले. आता मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्री यांनी घेतलेल्या निर्णयालाच आव्हान देऊन पक्षाला अडचणीत आणण्याची केदार यांनी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *