,मुंबई : मुंबई महापौर निवडणूक येत्या ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिका मुख्यालयात होणार आहे. शिवसेना उबाठा पक्षानेही महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. सात फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी शिवसेना उबाठाचेही महापौर-उपमहापौर उमेदवार येणार असून, त्यांच्यासोबत सर्व नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत. तसे पक्षाकडून आदेशही देण्यात आले आहेत. मात्र उबाठा पक्षाकडून महापौर-उपमहापौर उमेदवार अर्ज कोण सादर करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे
मुंबई महापालिकेत भाजपचे ८९, शिवसेना उबाठाचे ६५, शिवसेना (शिंदे गट) २९ नगरसेवक आणि मनसे, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्षाचेही नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, एमआयएम, मनसेकडून कोकण भवन आयुक्तांकडे गटनोंदणीही पूर्ण केली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनोंदणी पूर्ण झालेली नाही. शिवसेनेला पाठिंबा म्हणून सहयोगी गट स्थापनही केला जाणार आहे. ही प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. महत्त्वाच्या पक्षांची गटनोंदणी झाल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीला वेग आला आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी राजश्री शिरवडकर, अलका केरकर, रितू तावडे यांच्यासह काहींची नावे चर्चेत आहेत. यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही; तर शिवसेनेचा (शिंदे गट) उपमहापौर होणार का, यावरही अद्याप निर्णय नाही. सात फेब्रुवारीला नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची मुदत असल्याने महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर कोण, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठानेही महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सात फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरपदाचा अर्ज सादर करण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबई महापालिका सभागृहात दाखल होण्याचे आदेश उबाठा पक्षाने नगरसेवकांसाठी काढले आहेत.
महायुतीचे संख्याबळ जरी जास्त असले, तरीही उबाठाकडूनही महापौर निवडणुकीत उतरण्याची तयारी करून वेगळीच खेळी खेळण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला उतरवायचे, यावर सध्या चर्चा सुरू आहे. या संदर्भात मुंबई महापालिका गटनेत्या, शिवसेना उबाठा पक्ष, किशोरी पेडणेकर यांनी, महापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणूक ११ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभा घेऊन होईल. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त, भूषण गगराणी असतील. त्या दिवशी ही निवडणूक पार पडेल. तीन दिवसांनी गटनेते, वैधानिक समिती सदस्यांची घोषणा होईल.