• Fri. Jun 26th, 2026

    शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांवर संतापले, त्यांना माझा उल्लेख करण्याचा…; विलीनीकरणावरही भूमिका जाहीर

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2026
    शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांवर संतापले, त्यांना माझा उल्लेख करण्याचा…; विलीनीकरणावरही भूमिका जाहीर
    बारामती
     उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला असून यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अजित पवार यांच्याशी आमची सर्व चर्चा झाली होती आणि लवकरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार होती, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र अशी कोणतीही चर्चा अजित पवार यांनी आमच्याशी केली नव्हती, असं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आज बारामती इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
    “तुम्ही विलीनीकरणाबद्दल भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर अजितदादांनी मला त्याबाबत कल्पना दिली असती. तसंच विलीनीकरणाचा मुद्दा होता तर पवारसाहेब एनडीएसोबत येणार होते का? असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?” असा प्रश्न आज बारामती येथील पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवारांनी म्हटलं की, “त्यांना माझ्याबाबतचा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे, हे समजलं नाही. कारण या विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, हे मला माहीत नाही,” अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सुनावलं आहे.

    “अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हा लोकांसमोर जे संकट आहे, त्यातून परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं, यावर आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाशी संबंधित आम्ही कोणाशी चर्चा करत नाही,” असंही विलीनीकरणाबाबत बोलताना शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना संधी दिली, याचा आम्हाला आनंद असल्याचंही ते म्हणाले.

    दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांतच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं म्हणत पवार यांनी बोलणं टाळलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed