Uddhav Thackeray Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकाच विमानानं प्रवास केला आहे. दोघेही नेते इंडिगोच्या विमानानं मुंबईहून नागपूरला रवाना झाले. यावेळी दोन्ही नेते विमानात एकाच रांगेत पाहायला मिळाले. दोघांची आसनं एकाच रांगेत होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकाच विमानानं प्रवास केला आहे. दोघेही नेते इंडिगोच्या विमानानं मुंबईहून नागपूरला रवाना झाले. यावेळी दोन्ही नेते विमानात एकाच रांगेत पाहायला मिळाले. दोघांची आसनं एकाच रांगेत होती. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच रांगेत असलेल्या विंडो सीटवर बसलेले दिसले. उद्धव यांच्या शेजारी त्यांचे पुत्र आणि शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे बसलेले होते. दोन्ही नेत्यांच्या पक्षांकडून हा एकत्र प्रवास योगायोगानं झाल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी नागपूरला जात होते. इंडिगोच्या विमानानं ते मुंबईहून निघाले. याच विमानातून शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रवास केला. दोन्ही नेते एकाच रांगेत बसले होते. शिवसेना उबाठाचे ६ खासदार चारच दिवसांपूर्वी फुटले आणि शिंदेसेनेत प्रवेशकर्ते झाले. या ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे आणि फडणवीस पहिल्यांदाच एकत्र दिसले. Operation Tiger: पाच तयार होते, सहावा खासदार ऐकेना! CM फडणवीसांनी कसं मन वळवलं? पडद्यामागे काय काय घडलं? ठाकरेसेनेच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरेंनी सुरू केला. त्यासाठीच ते नागपूरला जात आहेत. तिथून ते यवतमाळ-वाशिमला जातील. या मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख शिंदेसेनेत गेले आहेत. त्यांच्या मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरेंकडून केला जाणार आहे. उद्धव ठाकरे मतदारसंघातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधतील.
यवतमाळ-वाशिमनंतर ठाकरे पुढील मतदारसंघांमध्ये जातील. फडणवीस आणि ठाकरे यांनी केलेल्या एकत्र प्रवासाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. या प्रवासाकडून कोणत्याही चष्म्यातून पाहू नका. हा निव्वळ योगायोग आहे. खासगी विमान, हेलिकॉप्टर वापरुन इंधनाचा अपव्यय करू नका, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडिगोच्या विमानानं प्रवास केला असावा, असं मिश्किल भाष्य अंधारे यांनी केलं. Sanjay Dina Patil: परत आलात तर मारुन पाठवेन; विसरुन जाईन मी खासदार आहे! शिंदेसेनेच्या खासदाराची पत्रकारांना शिवीगाळ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील हा प्रवास म्हणजे निव्वळ योगायोग असल्याचं म्हटलं. विमान कंपनीकडे तिकीट काढून दोन नेत्यांनी प्रवास केला असेल. आपण एकाच विमानानं प्रवास करणार आहोत, हे कदाचित त्या दोन नेत्यांनादेखील माहीत नसेल. योगायोगानं त्यांची भेट झाली असेल, असं मुनगंटीवार म्हणाले. दोघांनी एका विमानानं प्रवास केला ही बातमी नाही. त्या दोघांनी काही चर्चा केली असती, तर ती बातमी असती, असं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना उबाठा आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. १३ खासदार आणि ५७ आमदार असलेला पक्ष सोबत असताना ३ खासदार आणि २० आमदार असलेल्या पक्षासोबत कोण जाणार, असा सवाल त्यांनी विचारला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा