• Sat. Jun 27th, 2026

    रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 26, 2026
    रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    पुणे, दि. २६: जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर मिळत असल्याने हा प्रकल्प नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा प्रकल्प आहे, या कुटुंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

    पुणे जिल्हा परिषद, पंचायत राज संस्था, ग्रामपंचायत रासे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया आणि सिटी बँकेच्या सामजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील रासे (ठाकरवाडी) येथे आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या ५२ गृहसंकुलांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच वाडा ते साकुर्डी दरम्यान प्रवासी बोट सेवेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पणही करण्यात आले.

    यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बांधकाम सभापती दिपाली हुलावळे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक विकास खरात, उप कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे शीला कृपालानी आदी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, घर हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्या हक्काच्या घरात जाण्याची ओढ लागलेली असते आणि तेच माणसाला जगण्याचा बळ देत असते.

    रासे येथील पूर्वीच्या घराची अवस्था अतिशय बिकट होती, हालाखीच्या परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत होते. आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता होती. आज ठाकर समाजातील ५२ कुटुंबाचा हक्काचे आणि संघर्षाची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे आजचा क्षण हा त्यांच्यासाठी अतिशय आनंद, समाधान आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

    त्या पुढे म्हणाल्या, या गृहसंकुलात सोलर पॅनलच्या माध्यातून वीज, शौचालय, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून नागरिकांच्या मागणीप्रमाणे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा,भूमिहीन कुटुंबाना हक्काच्या घरासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतूकास्पद आहे, असेही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

    खेड तालुक्याची जलपर्यटन, उद्योग, शेती आणि जलसमृद्ध वारसामुळे राज्यभर ओळख आहे. भीमाशंकर चासकमान परिसरात पुनश्च सुरु करण्यात आलेल्या प्रवासी बोट सुविधामुळे गावामधील संपर्क जोडण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी, पर्यटक, कामगार, विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे ही सेवा केवळ संपर्क सुविधा नसून ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे, तालुक्यातील पश्चिम भागातील आपत्कालीन परिस्थिती संपर्क साधण्यास मदत होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

    त्या पुढे म्हणाल्या, स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत गायरान जमिनीबाबत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने केलेल्या सहकार्याबाबत आभार  व्यक्त करत यापुढेही राज्य शासनास अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.

    यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रतिमात्मक चाव्याचे वितरण करण्यात आले.

    यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, रासे ग्रामपंचायतीचे सरपंच किरण ठाकर, उपसरपंच लक्ष्मण शिंदे, ग्रामसेवक मंगल खरपुडे, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, अधिकारी, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे प्रतिनिधी, लाभार्थी कुटुंबे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed