• Fri. Mar 13th, 2026
    प्रफुल पटेल NCP चे अध्यक्ष झाले की नाहीत? स्वतःच सांगितलं; पीयूष गोयल म्हणाले, मला नंतर कळलं की…

    अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद गेलं असतानाच पक्षाचे दोर मात्र प्रफुल पटेल यांच्याकडे जात असल्याचं सूतोवाच पीयूष गोयल यांनी केलं होतं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाकडे जाणार, याची चर्चा रंगली असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते पीयूष गोयल यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिली. त्यानंतर गोयल यांनीही पत्रकारांनी आपल्याला चुकीची माहिती दिल्याचं वक्तव्य करत खेद व्यक्त केला.

    अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद गेलं असतानाच पक्षाचे दोर मात्र प्रफुल पटेल यांच्याकडे जात असल्याचं सूतोवाच गोयल यांनी केलं होतं. विशेष म्हणजे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंबंधी भाष्य केल्याने त्याचं गांभीर्य वाढलं होतं. मात्र याबाबत तर्कवितर्काना उधाण येताच पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं.

    प्रफुल पटेल काय म्हणाले?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी ‘एक्स पोस्ट’ द्वारे दिले आहे.
    Maharashtra TimesRupali Patil : अजित दादांच्या दोन्ही मूळ पायलटना उशीर, अचानक दोघंही बदलले; अपघात की घात? रुपाली पाटलांचे महत्त्वाचे सवाल
    राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही पटेल यांनी सांगितले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.
    Maharashtra TimesSunetra Pawar : शरद पवारांचे NDA मध्ये शिरकावाचे प्रयत्न? दिल्लीत मोठ्या हालचाली, सुनेत्रा पवारांच्या ‘वेगवान’ शपथविधीमागे दडलंय काय?

    पीयूष गोयल यांचं स्पष्टीकरण

    एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी खेद व्यक्त करतो.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा