• Sun. Mar 15th, 2026

    धावत्या लोकलमध्ये चढणं बेतलं जीवावर

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    धावत्या लोकलमध्ये चढणं बेतलं जीवावर
     बदलापूर
    धावती लोकल पकडताना तोल जाऊन रुळांवर पडल्याने २८ वर्षीयमहिलेचा मृत्यूझाल्याची घटना शनिवारी सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. चेतना देवरुखकर असे या महिलेचे नाव असून त्या बदलापूर पूर्वेकडील ज्युवेली गाव परिसरातील रहिवासी होत्या.काय घडलं?

    चेतना या नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ८.१० वाजताची लोकल पकडण्यासाठीबदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आल्या. मात्र त्याचवेळी लोकल सुटत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महिला डब्यात चढताना त्यांचा तोल जाऊन त्या थेट रुळांवर पडल्या. यात त्यांना लोकलचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनं इतर महिला प्रवाशांचाही अंगाचा थरकाप उडाला. चेतना या बदलापूर पूर्वेकडील जगन्नाथ गॅलेक्सी सोसायटीत राहत होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्या ठाण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत होत्या.

    ‘कल्याणपलीकडच्या पट्ट्यात लोकसंख्या आणि प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली असतानाही रेल्वे सुविधांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे लोकलगाड्यांची संख्या व डबे वाढवणे, तसेच कल्याण-कर्जत शटल सेवा सुरू करणे तातडीचे आहे,’ असे मत उपनगरीय रेल उपभोक्ता समितीचे सदस्य मनोहर शेलार यांनी व्यक्त केले. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    तर दुसऱ्या एका घटनेत, भिंवडी, पडघा येथील कंपनीतून सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून घरी परतत असलेल्या तरुणीचा डम्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात घडली. सोनम कदम (२३) असे तिचे नाव असून, दुचाकीचालक कौशल पवार (२९) या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाला. पडघा येथील एका खासगी कंपनीत काम करणारी सोनम शनिवारी संध्याकाळी ६च्या सुमारास कौशलसोबत कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील घरी परतत होती. त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव डम्परने धडक दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *