• Fri. Mar 6th, 2026

    सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

    ByMH LIVE NEWS

    Jan 31, 2026
    सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

    नाशिक, 

    नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिले.
    केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पायाभूत सुविधा व तयारी कामकाजाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे आदी उपस्थित होते.

    केंद्रीय मंत्री श्री. शेखावत म्हणाले की, कुंभमेळ्याचे मोठे अध्यात्मिक महत्व आहे. त्याचे प्रतिबिंब रामकाल पथमध्ये उमटले पाहिजे. रामकाल पथ साकारताना स्थानिक वास्तू कलेशी सुसंगत रचना करावी. तसेच रंगसंगतीच्या माध्यमातून भाविकांना रामायण काळाची माहिती होईल, असे नियोजन करावे. त्यासाठी चित्रकला शाखेच्या स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. कुंभमेळ्याचे नियोजन करताना महिला, तरुणांसह समाजातील विविध घटकांचा सहभाग घ्यावा. कुंभमेळ्यानिमित्त तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्यावी. त्यात त्यांना कुंभमेळ्याचे महत्व याविषयीची माहिती द्यावी.

    कुंभमेळ्यानिमित्त देश- विदेशातून भाविक येतील. त्यांच्यासाठीच्या पायाभूत सोयीसुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. या कालावधीत मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात. रामकाल पथसह उर्वरित विविध विकास कामांसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने सादर करावा. तसेच त्र्यंबकेश्वर येथील विकास कामांचा समावेश असलेला परिपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखडा सादर करावा. गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे. भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. तसेच भाविकांसाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करावी. नाशिकसह जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने ब्रॅण्डिग करावे. नाशिक, त्र्यंबकेश्वर हवाई दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात का याची पडताळणी करावी, अशाही सूचना केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांनी केल्या.

    विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विकास कामे, साधूग्राम, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, रामकाल पथ, भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन याविषयी सविस्तर माहिती दिली.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed