Rupali Chakankar Post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. रूपाली चाकणकर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे म्हटले आहे.
आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली. सूर्याच्या साक्षीने दादांचं काम सुरू व्हायचं, काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar Death : ‘हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही’, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे, असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाल्याच म्हणत चाकणकर यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.
