• Tue. Mar 10th, 2026
    Crime News: ‘चित्रपट पाहताना माझ्या नाही तर त्याच्या शेजारी का बसले?’, कपडे बदलताना पत्नीने चाकू घेतला अन्…

    Bhandara Wife Attack On Husband: चित्रपट पाहायला गेले, पण पती हा पत्नीच्या बाजुला न बसता मित्राच्या बाजुला जाऊन बसला. यामुळे पत्नी संतापली आणि तिने थेट आपल्या पतीवर हल्ला केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी विनोद वाघमारे, भंडारा: ‘चित्रपट पाहताना मित्राच्या शेजारी का बसला’, या क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीवर चाकूहल्ला केल्याची भयंकर घटना भंडाऱ्यात घडली आहे. या घटनेत पती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

    चित्रपट पाहायला गेले पण पत्नीच्या बाजुला न बसता मित्राच्या शेजारी बसले

    याप्रकरणी तक्रारदार आशिष शंकर मिश्रा (वय 39, राहणार नाकाडोंगरी) हे 26 जानेवारी रोजी दुपारी पत्नी शिवानी मिश्रा, मुलगी आणि दोन मित्रांसह तुमसर येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटगृहात आशिष हे आपल्या मित्राच्या शेजारी बसले होते. पती आपल्या शेजारी न बसता मित्राच्या शेजारी बसला, यामुळे त्यांची पत्नी शिवानी ही चांगलीच संतापली होती. या कारणावरून दोघांमध्ये चित्रपटगृहाबाहेर आणि घरी परततानाही जोरदार वाद झाल्याची माहिती आहे.

    स्वयंपाकघरातील चाकूने केला पतीवर वार

    त्यानंतर सोमवारी (26 जानेवारी) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास आशिष हे घरी कपडे बदलत होते. तेव्हा पत्नी शिवानी यांनी पुन्हा जुन्या वादावरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याशी भांडण केलं. दोघांमधील वाद वाढल्याने रागाच्या भरात शिवानी स्वयंपाकघरात गेली आणि तिने भाजी कापण्याचा चाकू आणला. त्यानंतर संतापलेल्या शिवानीने थेट पती आशिष यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. आशिष यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता, चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराला लागला. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचं रक्त वाहू लागले.

    या घटनेनंतर आशिष यांनी गोबरवाही पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी शिवानी मिश्राविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल लंकेश्वर रघुर्ते करीत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा