Railway Schedule Change: पुणे विभागातील महत्त्वाच्या एक्स्प्रेसचे टर्मिनल बदलण्यात आले असून आता ही गाडी हडपसर स्थानकावर थांबणार आहे. २६ जानेवारीपासून हा बदल लागू होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे रेल्वे विभागातील नांदेड-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या ठिकाणात बदल केला आहे. या गाड्या २६ जानेवारीपासून हडपसर टर्मिनल येथून सुटणार असून, हडपसरपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. काही प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्यांच्या टर्मिनल बदलाला विरोध करण्यात येत आहे.
२६ जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा प्रवास पुणे स्टेशनऐवजी हडपसर स्थानकावर संपणार आहे. ही गाडी पहाटे साडेचार वाजता हडपसर स्थानकावर येणार आहे. त्यामुळे तेथून इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांना पीएमपीचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागू शकतो. खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डेमूने प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. मात्र, त्यासाठी एक तासभर स्थानकावर बसून राहावे लागेल, असे संघटनांनी म्हटले आहे.
