मिळालेल्या माहितीनुसार, कुरणखेड येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विभागाजवळ पैलपाडा पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. मुर्तीजापुरहून अकोल्याकडे जाणारा ट्रक (एन.एल.01 ए.के.1105) आणि समोरून येणारा ट्रक (एम.एच.28 बि.बी.3667) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. एका चालकाचे नाव जगजीत सिंग (रा. यवतमाळ) असून, दुसरा चालक देविदास नारायणन (रा. जळका भडंग, खामगाव) असल्याचे समजते.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनोज उघडे आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक परिश्रम घेऊन अपघातग्रस्त ट्रकांमधून मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर, मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, या मदतकार्यात वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख विजय माल्टे, शाहबाज शाहा, उमेश माल्टे, अक्षय मोरे, तसेच पैलपाडा येथील आपत्कालीन पथकाचे रंजित घोघरे, विरू देशमुख, राम उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.