• Mon. Mar 16th, 2026

    उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री

    ByMH LIVE NEWS

    Jan 25, 2026
    उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री

    नागपूर 

    शाईनिर्मितीच्या व्यवसायापासून ते संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमधील अग्रणी उद्योजक असा अतुलनीय प्रवास साकरणारे उद्योगपती तसेच सोलर इंडस्ट्रिजचे अध्यक्ष सत्यनारायण नंदलाल नुवाल यांना रविवारी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारतच्या प्रत्यक्षात उतरवित असलेल्या शिलेदाराचा पद्म पुरस्काराने यथोचित सन्मान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

    राजस्थानातील एका छोट्याशा गावात जन्मलेले सत्यनारायण नुवाल यांचे बालपण आणि परिस्थिती भारतातील लाखो गरीब कुटुंबांसारखीच होती. आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच मर्यादित राहिले. कुटुंबाची जबाबदारी इतक्या लवकर त्यांच्या खांद्यावर आली की अवघ्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. परिस्थिती इतकी कठीण झाली की त्यांना घर सोडावे लागले.

    कामाच्या शोधात ते महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आले. तेथे एका नातेवाईकासोबत काम करण्याची संधी मिळाली. आयुष्य थोडे स्थिर होऊ लागले, पण ध्येय अजूनही दूर होते. याच काळात त्यांची भेट एका अशा व्यक्तीशी झाली, ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. त्यांचे नाव होते अब्दुल सत्तार अल्लाहभाई. त्यांच्याकडे स्फोटकांचा परवाना आणि बारूदचा डेपो होता.

    नुवाल यांनी हा डेपो दरमहा १ हजार रुपये देत भाड्याने घेतला. पण त्या काळात १ हजार रुपयेही त्यांच्यासाठी मोठी रक्कम होती. जेव्हा भाडे देण्यात उशीर झाला, तेव्हा अब्दुल सत्तार यांनी फक्त एवढेच म्हटले,‘तीन महिन्यांनी एकदा दिले तरी चालेल. मला तुझ्यावर विश्वास आहे.’ त्यांचा विश्वास नुवाल यांनी सार्थकी लावला. त्यांना हळूहळू कोळसा खाणींकडून ऑर्डर्स येऊ लागल्या.

    छोट्या व्यवहारांचे मोठ्या करारांमध्ये रूपांतर होऊ लागले. सुरुवातीला ते फक्त हँडलिंग करायचे. नंतर कन्साइनमेंट एजंट बनले आणि हळूहळू नाव कमावू लागले. १९८० पर्यंत स्फोटक उद्योगात त्यांची ओळख निर्माण झाली. १९९५ मध्ये त्यांनी बँकेकडून ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून सोलर इंडस्ट्रिजची पायाभरणी केली. परवाने मिळाले, प्रकल्प उभे राहिले, उत्पादन वाढले, ऑर्डर्स आल्या आणि सोलर इंडस्ट्रिजने भरारी घेतली.
    २००६ मध्ये कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. २०१० मध्ये सोलर ही भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली, जिला भारतीय सैन्यासाठी स्फोटके तयार करण्याचा परवाना मिळाला. आज सोलर जवळपास शंभर देशांत कार्यरत आहे. संरक्षण क्षेत्रापासून खाण उद्योगापर्यंत, स्फोटकांपासून दारुगोळ्यापर्यंत त्यांचे साम्राज्य विस्तारले आहे. त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये मोजली जाते. २०२२ मध्ये त्यांचा फोर्ब्सद्वारे घोषित अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

    सत्यनारायण नुवाल फक्त दहावीपर्यंत शिकले, पण त्यांनी आयुष्याची सर्वात मोठी शाळा अनुभवातून शिकली. संयम, संघर्ष, विश्वास, संधी आणि योग्य वेळ या सर्वांचा अर्थ त्यांनी जाणून घेतला. म्हणूनच त्यांचे नाव केवळ संपत्तीसाठी नाही, तर सन्मानासाठी घेतले जाते.

    कार्याला प्रोत्साहित करणारा क्षण

    संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात काम करत असताना कधीही पद्मश्री पुरस्कार मिळेल, असा विचार केला नव्हता. मात्र, कार्याची दखल घेत केंद्र सरकारने केलेल्या या गौरवामुळे अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे निश्चितच आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेला गती मिळेल, अशी भावना उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed