जळगाव महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण आज मुंबई येथून जाहीर झाले आहे. जळगाव महापौर पदासाठी महिला ओबीसी प्रवर्गाला आरक्षण सोडत निघाली आहे. आता नेमकं या महत्त्वाच्या खुर्चीवर निष्ठावान बसणार की नेत्यांच्या जवळीक असणाऱ्यांना संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी कालच प्रकाश बालाणी तर शिवसेनेच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे जळगाव महानगरपालिकेचे महापौरपद कोणत्या वर्गाला मिळेल? अखेर आज ते स्पष्ट झालं आहे. जळगाव महापालिकेचं महापौर पद हे महिला ओबीसींसाठी राखीव निघाले असल्याने अनेकांच्या नजरा महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे.
भाजपला 46 जागांवर यश आल्याने भाजपचाच महापौर होणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे भाजपमधूनच महापौर पदासाठी चांगलीच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. यात निष्ठावान म्हणून भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या अनेक वर्षांपासून जळगाव महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांना महापौर पदाची संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वैशाली अमित पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे. निवडणुकीत ऐनवेळेस उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून मंगेश चव्हाण यांनी त्यांना बिनविरोध निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा होता. मंगेश चव्हाण हे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभारी होते. वैशाली पाटील या मंगेश चव्हाण यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी वर्णी लागू शकते.
या शर्यतीत दीपमाला काळे यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांची देखील महापौर पदासाठी वर्णी लागू शकते. पण आमदार सुरेश भोळे हे जळगाव शहराचे आमदार आहेत. त्यामुळे महापौर पद हे सुरेश भोळे यांच्या मर्जीतीलच एकाद्या व्यक्तीकडे असावे, असा प्रयत्न देखील सुरेश भोळे करीत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्याच मर्जीतील महापौर बसला गेला पाहिजे असे प्रयत्न असण्याची शक्यता आहे. करण महापालिकेमध्ये चालणारा कारभार हा मंत्री गिरीश महाजन यांना कळावा यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्याच निकटवर्तीयांची त्या ठिकाणी वर्णी लागू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपच्या निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायत्री या देखील तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. तर अंकिता पंकज पाटील यांची देखील या ठिकाणी वर्णी लागू शकते. या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. पण एकंदरीत बघता जळगाव महानगरपालिकेचा महापौर हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्ती होतो की जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचा निकटवर्ती होतो हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल.
