मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिंदेसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. याबद्दल महायुतीनं अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येऊ शकत नाही. आकड्यांचा खेळ लक्षात घेऊन शिंदेसेनेनं महापौरपदाची मागणी केली आहे. शिंदेसेनेला वर्षभरासाठी महापौरपद दिलं जाऊ शकतं. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. शिंदेसेनेला महापौरपद सोडून भाजप ठाकरे बंधूंना अप्रत्यक्षपणे धक्का देऊ शकतं. शिंदेसेनेला महापौरपद सोडण्याचे दोन फायदे भाजपला होऊ शकतात.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २३ जानेवारीपासून सुरुवात होईल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत त्यांच्या पक्षाचा महापौर असावा, असं भावनिक कार्ड शिंदेसेनेनं काढलं आहे. त्यामुळे भाजप वर्षभरासाठी शिंदेसेनेसाठी महापौरपद सोडू शकतो. बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन म्हणून त्यांच्या पक्षाला महापौरपद देत आहोत, अशी घोषणा भाजपकडून केली जाऊ शकते. बाळासाहेबांची शिवसेना आमच्या सोबत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. त्यामुळे शिंदेसेनेला महापौरपद सोडून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करत असल्याचा संदेश भाजपकडून दिला जाऊ शकतो.
महापौरपद वर्षभरासाठी शिवसेनेला देऊन भाजपकडून ठाकरे बंधूंचं नरेटिव्ह खोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. भाजप मराठी माणसांच्या विरोधात आहे. भाजप अमराठी समुदायाची बाजू घेणारा पक्ष आहे, असा प्रचार, प्रसार ठाकरे बंधूंनी निवडणूक काळात केला आहे. आता शिंदेसेनेसाठी महापौरपद सोडून हा प्रचार खोडून काढण्याची संधी भाजपकडून साधली जाऊ शकते. याचा फायदा भाजपला दिर्घकाळ होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या पक्षासाठी महापौरपद सोडलं, असं नरेटिव्ह उभं करुन ठाकरे बंधूंची गोची केली जाऊ शकते.
