• Fri. Jun 19th, 2026
    Raj Thackeray : ‘निवडणुका येतील जातील पण आपला…’; मुंबई गमावल्यानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

    Raj Thackeray Facebook Post : काल महापालिका निवडणुकीच्या लागलेल्या निकालावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट करत सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय.

    राज ठाकरे फेसुबक पोस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा गड भाजप-शिंदे गटाने काबीज केला. काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजप 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर ठाकरे गटाला 65 जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल पाहता भाजपने मुंबईत ठाकरे गटाला चीतपट केल्याचे दिसतं. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट करत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे.

    राज ठाकरे काय म्हणाले?

    सस्नेह जय महाराष्ट्र,
    सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.

    Maharashtra TimesBMC Election 2026 : शिवसेनेला नाकारुन भाजपचा महापौर, शिंदेंनी काय मिळवलं? ठाकरेंच्या शिलेदाराचे सात घणाघाती प्रश्न, तिसरा सवाल थेट…बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
    लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
    आपला नम्र
    राज ठाकरे

    मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

    भाजप – 89
    ठाकरे गट – 65
    शिवसेना – 29
    काँग्रेस – 24
    एमआयएम -8
    मनसे – 6
    राष्ट्रवादी काँग्रेस – 3
    समाजवादी पार्टी – 2
    शरद पवार गट -1

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा