• Fri. Sep 4th, 2026

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (विमाका) :- मराठवाड्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुले आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करावीत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. क्रीडा संकुलांच्या विकासासाठी येणाऱ्या अडचणींचे विभागीय पातळीवर तातडीने निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयातील त्यांच्या दालनात मराठवाड्यातील विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुलांचे अद्ययावतीकरण, क्रीडा संकुलांसाठी आवश्यक असलेली जमीन, उपलब्ध निधीचा विनियोग आणि अतिरिक्त निधीची मागणी याबाबत विभागातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, लातूर क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक मिलिंद दीक्षित, जालना जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, धाराशिवच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर, नांदेडचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, लातूरचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, परभणीचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, हिंगोलीचे प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर उपस्थित होते.

जी. श्रीकांत म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात विविध खेळांतील उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी स्थानिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे नियमित आयोजन झाले पाहिजे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यास प्राधान्य द्यावे. ज्या जिल्ह्यांत अद्याप सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध नाही, त्यांनी सिंथेटिक ट्रॅक उभारण्यासाठी तातडीने विकास आराखडा सादर करावा. क्रीडा संकुलांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही जिल्हा पातळीवर प्रस्ताव सादर करून त्याचा नियमित पाठपुरावा करावा.

तरुण पिढीला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यातील खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने विकसित करण्यासोबतच क्रीडा संकुलांच्या भविष्यातील विस्तारासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

क्रीडा संकुलांच्या विकासाचे नियोजन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करून प्राधान्यक्रम निश्चित करावेत. आधुनिक बाबींचा समावेश असलेला उच्च दर्जाचा आराखडा वास्तुविशारदांकडून तयार करून आवश्यक निधीसाठी येत्या दहा दिवसांत प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावित निधी विविध स्रोतांतून लवकर उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाठपुरावा करावा. यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विभागीय क्रीडा उपसंचालकांनी विभागीय स्तरावर समन्वय साधावा. निधी उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

सुरू असलेल्या कामांची ड्रोनद्वारे पाहणी :-

सध्या प्रगतिपथावर असलेल्या क्रीडा संकुलांच्या कामांची ड्रोनद्वारे पाहणी करून कामांची छायाचित्रे व व्हिडिओ संकलित करावेत आणि त्याआधारे प्रगती अहवाल वेळेत सादर करावा. क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापूर्णच झाली पाहिजेत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विजेते व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे व पारितोषिके देण्यात यावीत. क्रीडा संकुलांमध्ये आधुनिक सुविधांसोबत स्वच्छतागृहेही अत्यंत स्वच्छ व सुस्थितीत ठेवावीत. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता कायम राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांना योग्य मानधन मिळत आहे की नाही, याची खातरजमा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी स्वतः करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दर सोमवारी एक तास स्वच्छता मोहीम :-

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुल परिसरातही दर सोमवारी सकाळी १० ते ११ या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या उपक्रमात स्वतः सक्रिय सहभाग घ्यावा. नियमित स्वच्छता मोहिमेमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजण्यासोबतच क्रीडा संकुल परिसर स्वच्छ व सुस्थितीत राखण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

क्रीडा संकुलाच्या इमारती व परिसराची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि निगा राखणे आवश्यक आहे. परिसरातील हिरवळ कायम ठेवण्यासाठी विविध स्रोतांमधून पाणी उपलब्ध करून घेण्यासोबतच आवश्यकतेनुसार क्रीडा संकुलांमध्ये स्वतंत्र पाणीशुद्धीकरण केंद्र उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.

क्रीडा संकुलात प्रवेश करताच परिसर उत्साही, चैतन्यपूर्ण आणि सकारात्मक वातावरणाने युक्त दिसला पाहिजे. मराठवाड्यातून उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांचा सहभाग व समन्वय आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले.

बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय क्रीडा संकुलांची सद्यस्थिती, अद्ययावतीकरणाची कामे, उपलब्ध सेवा-सुविधा आणि प्रस्तावित कामांची माहिती सादर केली. तसेच क्रीडा संकुलांच्या विकासासंदर्भातील अडचणी व आवश्यक उपाययोजनांबाबत मते मांडली. विभागस्तरावरील बैठक यापुढेही नियमित होणार असून यासाठी छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक श्री.पाटील हे समन्वयक म्हणून काम बघणार आहेत.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed